लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : महाराष्ट्रातील औद्योगिक विजेचे दर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे ज्यादा असणारे हे विजेचे दर महावितरणने कमी करावेत, अशी मागणी कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यावर आले होते. यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनामध्ये कुपवाड एमआयडीसी येथे महावितरणचे स्वतंत्र नवीन सबस्टेशन तयार करावे, कुपवाड एमआयडीसीमध्ये उपकार्यकारी अभियंता पद निर्माण करावे याशिवाय राज्यातील औद्योगिक विजेचे दर कमी करण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
मंत्री नितीन राऊत यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालून उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, माजी सचिव चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ उद्योजक विजयकुमार चिपलकट्टी, मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय खांबे, व्यवस्थापक गणेश निकम आदींसह उद्योजक उपस्थित होते.