अतुल जाधव ।देवराष्ट्रे : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने गार्इंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. जनावरे सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. परिणामी जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी संकरित गार्इंची संख्या वाढली आहे. याचा परिणाम गार्इंच्या दरावर झाला आहे.
एरवी ७० हजार ते ८० हजार रुपयांना खरेदी होणारा गाईचा दर गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुमारे २५ ते ३० हजारापर्यंत खाली आला आहे. ४० ते ५० हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच गाई खरेदीकडे पशुपालकांनी पाठ फिरवली आहे.
जनावरे बाजारात गार्इंच्या खरेदी-विक्रीची उलाढाल कोट्यवधींची होत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गाईच्या दुधाच्या दराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शेतकरी गाई विक्रीचा पर्याय निवडत आहेत. गत दोन महिन्यांपासून संकरित गार्इंच्या दुधात मोठी चढ-उतार होत आहे. दुधाचा स्थिर दर राहील याची खात्री मिळत नसल्यामुळे गार्इंची खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच इतकी गंभीर स्थिती ओढवल्याचे शेतकरी सांगत आहेत.
गाईचे दूध स्वीकारण्यास दूध संघ नकार देत आहेत. गाईच्या दुधाला दर नाही व बाजारात गाईला किंमत नाही. त्यामुळे गाईला विक्रीसाठी बाजाराची वाट दाखवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. लाखो रुपये किमतीच्या गाई कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. संकरित गार्इंची आवक केल्याने सर्व जनावरे बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली आहे; पण ग्राहक कमी आहेत.
कडेगाव, शिराळा, वाळवा, तासगाव, मिरज या परिसरातून मोठ्या प्रमाणात गाईच्या दुधाचे उत्पादन होत असते. या परिसरातील अनेक कुटुंबे पूर्णत: दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. अचानक दूध व्यवसायात आलेल्या मंदीमुळे या कुटुंबांवर उपासमारीची व बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.अनुदानाची मुदत : ३१ रोजी संपणारशासनाने गाय दुधास ५ रुपयांचे अनुदान देऊन दुधास ५.५ फॅट व ८.५ एसएफएनसाठी २५ रुपयांचा दर निश्चित केला आहे; पण अनुदानाची मुदत ३१ जानेवारीला संपत असल्याने पुन्हा गाईचे दूध दर पडण्याची चिंता दूध उत्पादकांना वाटत आहे.