सांगली : सहकारी दूध संघाकडून दूध उत्पादकांना विविध सवलती दिल्या जात असतानाही खासगी संस्थांकडे ६५ टक्के, तर सहकारी दूध संस्थांकडे ३५ टक्के दूध संकलन होत आहे. सहकारी संस्थांकडून दूध उत्पादकांना सवलती मिळत असतानाही उत्पादकांचा खासगी संस्थांकडील वाढता ओढा ही बाब चिंंतनीय असल्याचे प्रतिपादन राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी सोमवारी केले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विभागाच्यावतीने देण्यात येणारे राजारामबापू पाटील आदर्श गोपालक पुरस्कार पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील पुढे म्हणाले की, खासगी दूध संस्थांपेक्षाही सहकारी दूध संस्थांकडून शेतकऱ्यांना विविध अनुदान देऊन दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही खासगी दूध संस्था काहीही मदत करीत नसताना त्यांच्याकडील वाढलेले संकलन चिंतनीय आहे. नवीन पिढीला दूध व्यवसाय नको आहे; मात्र तरीही तरुणांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून व्यवसायाकडे वळले पाहिजे. पारंपरिक पद्धतीने उत्पादक राबत राहिल्यास दुधाएवढेही उत्पन्न मिळत नाही. दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची गरज आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, माजी अध्यक्ष देवराज पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजीवकुमार सावंत, कुसुम मोटे, माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोपालक पुरस्कार मिरज तालुका-अण्णासाहेब कोले (दुधगाव), सचिन चव्हाण (खंडेराजुरी), पलूस तालुका-पवन कुंभार (कुंडल), सुनील भोसले (धनगाव), शिराळा-सचिन पाटील (औंढी), शैलेंद्र गायकवाड (पाडळी), आटपाडी- सुजित चौगुले (उंबरगाव), शशिकांत भोसले (नेलकरंजी), जत-उमेश सावंत (बिरनाळ), युवराज शिंंदे (शेगाव), वाळवा-संजय कुंभार (नरसिंंहपूर), नवनाथ सपकाळ (मर्दवाडी), खानापूर-विलास शिंंदे (लेंगरे), महादेव शिंंदे (माहुली), कडेगाव-गोरखनाथ तुपे (तुपेवाडी), दादासाहेब शिंंदे (चिखली), कवठेमहांकाळ- किशोर दवंडे (देशिंंग), सुनील पवार (रांजणी), तासगाव- यशवंत सोनटक्के (हातनूर), भाग्यश्री भोसले (बस्तवडे). रेश्मा सावंत (शेगाव, उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार)
दुधाचा कमी पुरवठा चिंतनीय
By admin | Published: January 03, 2017 11:34 PM