तांदूळवाडी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव (ता. वाळवा) येथील फाट्यावर कुरळप पोलीस ठाण्याच्यावतीने तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा बंदी असल्याने केवळ अत्यावश्यक सेवेसाठी निघालेल्या वाहनधारकांना सोडले जाते. या तपासणीमुळे बऱ्याच वाहनधारकांनी विनाकारण होणारा प्रवास टाळल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कोरोना संसर्ग संख्या वाढत असल्याने गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक लाॅकडाॅऊनचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे जिल्ह्याबाहेरून येणारे तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहे. शिवाय महामार्गावरील वाहनांचीही तपासणी केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कणेगाव येथील फाट्यावर कुरळप पोलीस ठाण्याच्यावतीने तपासणी नाका ठेवण्यात आला आहे. सध्या तुरळक प्रमाणात वाहनांची संख्या सुरू आहे. लाॅकडाॅऊनपूर्वी या महामार्गावर एका मिनिटात सहा वाहने धावत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असे. सध्या जिल्हा बंदी घालण्यात आली आसल्याने व अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने याचा परिणाम राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीवर झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तपासणी नाक्यावरील पोलीस व आरोग्य विभागावर ताण कमी आहे. तसेच कर्मचारी कोरोनाच्या धोक्यातही सुरक्षित काम करीत आहेत. ताण कमी असल्याने पोलीस कर्मचारीही सक्षमपणे कर्तव्य बजावत आहेत.