लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आपल्या जेवणात रिफाइंड तेलाचा सर्रास वापर केला जातो. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह हृदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे शक्यतो घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे नागरिकांमध्ये याबाबत वाढलेली सतर्कता पाहून शहर व परिसरात सध्या लाकडी व स्टिलच्या घाण्यातील तेल उत्पादन वाढले आहे.
तेल रिफाइंड करताना केमिकलचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या मते ही केमिकल्स आपल्या शरीरास सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेजिस् तयार होतात. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. तेल रिफाइंड करताना सुरुवातीला ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. डबल आणि ट्रिपल रिफाइंड करताना तेल अनेकवेळा उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात.
चौकट
रिफाइंड तेल घातक का?
- अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय रिफाइंड तेल तयार होत नाही.
- सिंगल रिफाइंडसाठी गॅसोलिन, सिंथेटिक अँटिऑक्सिडंटस्, हेक्सेन अशा प्रकारची केमिकल्स वापरली जातात.
- रिफाइंड तेलाचा वास येत नाही, कारण त्यात एकाही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहात नाही.
- रिफाइंड तेलाला चिकटपणा नसतो, कारण त्यातले फॅटी अॅसिड आधीच बाहेर काढले जातात.
- रिफाइंड तेलामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ आणि मिनरल्सही नसतात.
चौकट
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. रिफाइंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
चौकट
म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वांधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.
कोट
घाण्याच्या तेलामध्ये तेलबियांमधील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात. याशिवाय त्याच्या तळाशी राहिलेला चोथा म्हणजेच फायबर हे शरीराला उपयुक्त असते. अशा प्रकारच्या तेलातून शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात, जे रिफाईंड तेलातून मिळत नाहीत.
- शार्दुली तेरवाडकर, आहारतज्ज्ञ, सांगली