परप्रांतीय व्यापाऱ्यांनी तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. पोलिसात गुन्हे दाखल होऊनही शेतकऱ्यांना ती रक्कम मिळत नाही. दरवर्षी द्राक्ष बागायतदारांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असून, असे प्रकार वाढतच चालले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. याविषयी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होण्यामागची कारणे कोणती?उत्तर : शेतकरी मुलापेक्षाही जादा द्राक्षबागेवर प्रेम करतो. चोवीसपैकी १८ तास तो बागेतच काम करतो. द्राक्षे तयार होईपर्यंत खते, कीटकनाशके आणि मजुरांवर लाखो रूपये खर्च होतात. द्राक्षे तयार झाल्यानंतर ती कधी एकदा विक्री करतो, असे त्यांना होते. एखादा व्यापारी जादा दर देऊन द्राक्षे खरेदी करतोय म्हटल्यावर, कोणताही विचार न करता शेतकरी व्यापाऱ्यास द्राक्षे देतात. यामागे त्यांची आर्थिक अडचण हे महत्त्वाचे कारण आहे. याचाच गैरफायदा घेऊन परप्रांतीय व्यापारी फसवणूक करीत आहेत. व्यापारी एका शेतकऱ्यास रोखीने पैसे देऊन वातावरण निर्मिती करतो आणि दहा शेतकऱ्यांना गंडा घालून तो पसार होतो. द्राक्षे तयार करण्यासाठी शेतकरी जेवढा चोखंदळ राहतो, तेवढीच त्यांनी द्राक्षांची विक्री करतानाही काळजी घेतली पाहिजे.प्रश्न : बाजार समितीकडे व्यापाऱ्यांची नोंदणी का होत नाही?उत्तर : राज्याच्या पणन विभागाने शेतीमाल विक्रीवरील निर्बंध शंभर टक्के उठविले आहेत. त्यामुळे शेतकरी कोठेही आणि कोणालाही शेतीमालाची विक्री करू शकतो. व्यापाऱ्यांनी परस्पर शेतकऱ्यांकडून द्राक्षे, डाळिंब, बेदाणा खरेदी केला तरीही, त्यांच्यावर बाजार समिती कोणतेही निर्बंध घालू शकत नाही. याचाच गैरफायदा परप्रांतीय व्यापारी घेत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच काही व्यापारी काम करीत आहेत. ते स्वत:चे ओळखपत्र, पत्ता, दूरध्वनी नंबर काहीही शेतकऱ्यांना देत नाहीत. तरीही शेतकरी अशा व्यापाऱ्यांना द्राक्षांची विक्री करीत आहेत.प्रश्न : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून बाजार समितीने काही उपाययोजना केल्या आहेत का? उत्तर : द्राक्षे, डाळिंब, बेदाणा, केळी खरेदीसाठी परप्रांतीय व्यापारी जिल्ह्यात दरवर्षी येतात आणि शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा गंडा घालतात. हे ओळखूनच द्राक्ष हंगाम सुरु होण्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याबरोबर बैठक घेतली आहे. पोलिस अधिकारी, द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बाजार समिती अथवा द्राक्ष बागायतदार संघाकडे नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांकडेच द्राक्षांची विक्री करावी, अशी सूचना दिली होती. व्यापारी कशा पध्दतीने बागायतदारांची फसवणूक करीत आहेत आणि त्यावर उपाय कोणते करावेत, यासंबंधीची पाच हजार माहितीपत्रके सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्ह्यात वाटप केली आहेत. याचा मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात फायदा झाला आहे. येथील शेतकऱ्यांनी अनोळखी व्यापाऱ्यांना द्राक्षांची विक्री केली नाही. अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडेही व्यापाऱ्यांबाबत खात्री केली होती.प्रश्न : द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षांची विक्री करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? उत्तर : द्राक्षे, डाळिंब, केळी, बेदाणा व भाजीपाला विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी आर.टी.जी.एस. किंवा धनादेशाने रक्कम मिळाल्यानंतरच व्यापाऱ्यांना शेतीमाल दिला पाहिजे. माल देतानाही शेतकऱ्यांनी खरेदीदार व दलाल यांच्याशी करार करून घेण्याची गरज आहे. डिलिव्हरी चलनामध्ये दलालाचे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, वाहन क्रमांक, चालकाचे नाव याचा उल्लेख करून घ्यावा. खरेदीदार व्यापाऱ्यांकडून पॅनकार्ड, आधारकार्ड, ओळखपत्र, स्थानिक रहिवासी पत्ता यासह मोबाईलवर त्या व्यापाऱ्याचे छायाचित्र काढून घ्यावे. दहा वर्षे चांगल्या पध्दतीने व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघाकडे यादी असून त्यांच्याशीच शेतकऱ्यांनी व्यवहार करावेत. या व्यापाऱ्यांची माहिती बाजार समितीनेही संकलित करून ठेवली आहे. - अशोक डोंबाळे, सांगली
नियमन मुक्तीमुळेच द्राक्ष व्यापाऱ्यांचे फावले !
By admin | Published: April 21, 2017 11:07 PM