लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील तीस वर्षे झालेल्या कासेगावच्या मूळ व सुधारितसह कुंडल, तुंग, येळावी अशा पाच प्रादेशिक आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठ्याच्या १०० योजनांना पुनरूज्जीवन देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व प्रस्ताव तातडीने पाठवून देण्याच्या सूचनाही पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्ह्यातील प्रादेशिक आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना खूप जुन्या आहेत. यामुळे पाण्याची गळती मोठ्याप्रमाणात असून, पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही, त्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री खोत यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात खोत, देशमुख आणि पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांची बैठक झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाणी योजनांच्या वस्तुस्थितीची माहिती खोत यांनी घेतली. ३० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व प्रादेशिक योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी शासन तातडीने निधी देईल. शिवाय ३० वर्षे झालेल्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनांचेही प्रस्ताव सादर करण्याची सूचना खोत यांनी दिली. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव मूळ व पेठ, विठ्ठलवाडी, जांभुळवाडीसह आठ गावांसाठीची सुधारित योजना, पलूस तालुक्यातील कुंडल, तासगाव तालुक्यातील येळावी, मिरज तालुक्यातील तुंग प्रादेशिक योजना आणि १०० स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. या योजनांना पुनरुज्जीवन देण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.पलूसमध्ये रात्रीपासून पाणी पुरवठा सुरूपलूस : कुंडल प्रादेशिक योजना मंगळवारी रात्री उशिरा सुरू झाली असून, एक-दोन दिवसात संपूर्ण पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पलूसचे गटविकास अधिकारी चिल्लाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पलूस तालुक्यातील जवळपास निम्म्या गावांची तहान भागवणाऱ्या कुंडल नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा गेल्या मंगळवारी वीज बिल थकबाकीसाठी महावितरणने पाचव्यांदा बंद केल्याने, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांत मागील पाच-सहा दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे वृत वेळोवेळी प्रसिध्द केल्याने, याची दखल घेत, दोनच दिवसात सत्तावीस लाख सहासष्ट हजार रूपये जमा केले. पलूसचे गटविकास अधिकारी चिल्लाळ म्हणाले की, येथून पुढे ज्या ग्रामपंचायती नियमित व मागील थकबाकीपोटी पाणीपट्टी वेळेवर भरतील, त्यांनाच पाणी पुरवठा केला जाणार आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी कुंडल योजनेविषयी आवाज उठविल्याने आम्हाला मदतच झाल्याचे सांगून त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.टंचाई लक्षात घेऊन वीज जोडणी करणार : खोतंंपाणीटंचाई लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रादेशिक योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. थकीत वीज बिल भरणे नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी १५ समान हप्ते करण्याचा विचार आहे. ग्रामपंचायतीने पहिला हप्ता भरल्यानंतर लगेच वीज जोडणी करणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.
प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन
By admin | Published: May 09, 2017 11:43 PM