महाराष्ट्रात तीन लाख ५० हजार एकर द्राक्षबागा आहेत. यापैकी पावणेदोन लाख एकर द्राक्ष क्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील बागायतदार फक्त निर्यातीचे उद्दिष्ट ठेवूनच उत्पादन घेतो. सांगली, सातारा, पुणे, सोलापूरच्या बागायतदारांचा कल स्थानिक बाजारपेठ व बेदाणे निर्मितीवर असतो. दक्षिण आफ्रिकेतील द्राक्ष उत्पादन कमी झाल्याने यंदा जानेवारीपासूनच युरोपातून मागणी सुरू झाली आहे, असे निर्यातदार सांगत आहेत. आखाती देश, चीन, रशिया आणि ईशान्य आशियाई देशातही मागणी जास्त आहे. या वर्षी भारतातून निर्यात द्राक्षांची ४४ हजार २४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ४३ हजार ८५७ संख्या आहे. निर्यात द्राक्षांना सध्या प्रतिकिलोला किमान ७० ते कमाल ११० रुपये दर मिळत आहे.
चौकट
देशांतर्गत बाजारात दर वधारले
द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. निर्यात द्राक्षाला युरोप, आखाती देशाच्या बरोबरीने बेंगलोर, दिल्ली, मुंबई, पुणे येथील ग्राहकांना किलोसाठी ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागत आहेत. सोनाक्का, माणिक चमन, सुपेरीअर सिडलेस जातीची द्राक्षे आणखी महाग आहेत. यामुळे अनेक शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांनाच द्राक्षांची विक्री करत आहेत, अशी माहिती द्राक्षबागायतदार संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी दिली.
चौकट
निर्यातीसाठी या द्राक्षांना मागणी
थॉमसन सिडलेस, तास-अ-गणेश, सोनाक्का, माणिक चमन, सुपेरीअर सिडलेस या पांढऱ्या जाती, शरद सीडलेस, फ्लेम सीडलेस, क्रीमसन सीडलेस, फॅन्टसी सीलेस, रेडग्लोब या रंगीत जातीच्या द्राक्षांना युरोप, चीन, दुबई या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे. सध्या द्राक्षांची निर्यात चालू असून फेब्रुवारीमध्ये यामध्ये वाढ होणार आहे.
चौकट
आखाती देशात २७० कंटेनर रवाना
सांगली जिल्ह्यात २०१९-२० मध्ये २१३५ शेतकऱ्यांनी २९४३.५२ एकर द्राक्षांची निर्यातीसाठी नोंदणी झाली होती. या वर्षी दुप्पट ४२२३ शेतकऱ्यांनी ५६८६.०५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. बहारीन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब या आखाती देशामध्ये जिल्ह्यातून २७० कंटनेरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे, अशी माहिती कृषी अधिकारी पी. एस. नागरगोजे यांनी दिली.
चौकट
राज्यातील द्राक्षबागायतदारांकडून निर्यातीसाठी नोंदणी
जिल्हा शेतकरी संख्या
नाशिक ३६२४०
सांगली ४२२३
पुणे १२९३
नगर ५३६
सातारा ४९६
सोलापूर ४४१
उस्मानाबाद ३६८
लातूर १०८
बुलडाणा ९६
जालणा १६
बीड ०१
एकूण ४३८५७