सांगली : बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडीमध्ये निकाल पाहता येईल. दरम्यान, अतिरिक्त सीईटीसाठी नोंदणीची प्रक्रिया शनिवारपासून (दि. २९) सुरु होणार आहे.बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांकरिता अतिरिक्त सीईटी घेण्यात येणार आहे. यापूर्वी २९ मेरोजी सीईटी झाली होती. पण त्याची माहिती नसल्याने राज्यभरात लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. त्यांच्या मागणीनुसार नव्याने अतिरिक्त सीईटी घेणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यासाठीची ऑनलाईन नोंदणी सीईटी सेलच्या पोर्टलवर (www.cetcell.mahacet.org) २९ जून ते ३ जुलैदरम्यान करता येईल. २९ मेरोजी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. पण त्या परीक्षेतील निकालाबाबत समाधानी नसलेल्या आणि पर्सेंटाईल वाढविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना नवी सीईटी पुन्हा देण्याची परवानगी सीईटी सेलने दिली आहे. या दोन्ही सीईटीपैकी ज्यामध्ये जास्त पर्सेंटाईल असतील, ते प्रवेशासाठी दाखवता येतील.यंदा प्रथमच झालेल्या सीईटीला राज्यभरातून ५५ हजार विद्यार्थी बसले होते. माहिती नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. माहिती नसलेल्यांची प्रवेशाची संधी हुकण्याची भीती होती. त्यामुळे अतिरिक्त सीईटीचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त सीईटी कधी होणार? याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती सेलकडून देण्यात आली.
बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएमच्या अतिरिक्त सीईटीची नोंदणी सुरु
By संतोष भिसे | Published: June 28, 2024 6:08 PM