फोटो ११ रामकृष्ण आवटे
फोटो ११ म्हाळू कोरबू
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लस मिळविण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेषत: १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण अत्यल्प म्हणजे
अवघे ०.५८ टक्केच झाले आहे. या वयोगटात सुमारे १७ लाख ५० हजार तरुण लसीच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वांचे लसीकरण पूर्ण करायचे तर या गचीने वर्ष-दोन वर्षे लागण्याची भीती आहे.
कोविन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच लस मिळते; पण नोंदणीसाठी पोर्टलवर प्रचंड गर्दी आहे. महापालिका क्षेत्रात फक्त पाच केंद्रांवर या गटासाठी लस मिळते. जिल्ह्यात १३ ग्रामीण रुग्णालये व २ उपजिल्हा रुग्णालयांत मिळते.
नोंदणीसाठीचे पोर्टल रात्री ८ किंवा १० वाजता सुरू केले जाते. अवघ्या पाच-दहा मिनिटांतच बुकिंग फुल्ल होते. प्रत्येक केंद्रावर १०० ते २०० डोसच उपलब्ध होतात, त्यामुळे तितकेच बुकिंग खुले केले जाते. तरुणवर्ग पोर्टल सुरू होताच त्यावर झडप मारतो. त्यामुळे अपॉइंटमेंट मिळणे म्हणजे गड सर केल्यासारखी स्थिती आहे. नोंदणीसाठी वेळेपूर्वी अर्ध्या तासापासून पोर्टल सुरू करून बसावे लागत आहे. एकेका कुटुंबातील चौघे-पाचजण एकाचवेळा मोबाइलवरून प्रयत्न करताहेत, तरीही अपॉइंटमेंट मिळेल याची हमी मिळेना झाली आहे. लसीच्या तुटवड्याने सारेच हैराण आहेत.
जिल्ह्यात मोजक्याच केंद्रांवर लसीकरण असल्याने मिळेल त्या केंद्रावर जाण्याची तरुणांची तयारी आहे. सांगलीतून जत, पलूस, तासगाव, विटा अशा लांब-लांबच्या केंद्रांवरही नागरिक धाव घेताहेत.
चौकट
रात्री साडेसातपासूनच पोर्टलसाठी सज्जता
रात्री आठ वाजता कोविन पोर्टलवर सेल्फ रजिस्ट्रेशन सुरू होते. त्यासाठी साडेसात वाजल्यापासूनच मोबाइल किंवा संगणक सुरू करून बसावे लागत आहे. पोर्टल सुुरू होताच त्यावर उड्या पडत आहेत. पोर्टल उघडल्यानंतर मोबाइल नंबर टाकावा लागतो. त्यानंतर तीन मिनिटांच्या आता ओटीपी येतो. तो टाकल्यानंतर तुमचे राज्य व जिल्हा निवडावा लागेल. शिवाय वयोगट, लसीची कंपनी, मोफत किंवा सशुल्क हे पर्यायदेखील निवडावे लागतील. त्यानुसार उपलब्ध असणारे लसीकरण केंद्र दिसेल. त्यावर क्लिक करताच कन्फर्मेशन मिळेल. तुम्ही निवडलेल्या वेळेत केंद्रावर गेलात की लस मिळेल. तसा मेसेज मोबाइलवर आल्यानंतर प्रमाणपत्राची प्रिंट काढून घेऊ शकाल.
पॉईंटर्स
१८ ते ४४ वर्षे वयोगटात झालेले लसीकरण - १०,२५७
१८ ते ४४ वयोगटातील एकूण लोकसंख्या - १७ लाख ५० हजार
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झालेल्यांची टक्केवारी - ०.५८ टक्के
कोट
आठवडाभरापासून प्रयत्न करतोय...
आठवडाभरापासून ऑनलाइन नोंदणीसाठी प्रयत्न करत आहे; पण अपॉइंटमेंट मिळेना झाली आहे. कधी रात्री आठ वाजता तर कधी रात्री दहा वाजता पोर्टल सुरू होते. ते उघडेपर्यंत पाच मिनिटे जातात, तोपर्यंत लसीकरण केंद्रे फुल्ल झाल्याचे दिसते. त्यामुळे लस कधी मिळणार याची चिंता लागून राहिली आहे.
- रामकृष्ण आवटे, नरवाड
लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष नोंदणी घेतली नाही. ऑनलाइन नोंदणीचा प्रयत्न केला तर केंद्र मिळत नाही. जिल्ह्यात मोजकीच केंद्रे असल्याने अन्यत्र जाण्याचीही सोय नाही. गावात अवघे ५०, १०० डोस येत असल्याने लस मिळेेना झाली आहे.
- सचिन पाटील, बिसूर
माझ्या वयोगटासाठी आरोग्य केेंद्रात दोनदाच लस आली. मात्र, नोंदणी फुल्ल झाल्याचे सांगण्यात आले. मोबाइलवरून नोंदणीसाठी अनेकदा प्रयत्न केले; पण अपॉइंटमेंट मिळाली नाही. थेट नोंदणीही होत नसल्याने लसीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
- म्हाळू कोरबू, आरग
लसीचा पुरवठा अत्यंत कमी आहे. जिल्ह्यासाठी दोन लाख लसींची मागणी केली आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी अवघे १० हजार डोस मिळालेत. त्यातून पाच केंद्रांवर लसीकरणाची सोय केली आहे. नोंदणी केलेल्यांनाच लस मिळेल. लसीचा पुरवठा वाढताच केंद्रांची संख्याही वाढविली जाईल.
- डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी.