लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : आधुनिक जगात जात्यावरच्या ओव्यातून व्यक्त होणारी स्त्री आज हरवत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला नात्यातला दुरावा वाढताना दिसत आहे. परिणामी कुटुंबव्यवस्था हरवत चालली आहे, असे मत रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
ते येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेच चौथे व्याख्यानपुष्प गुंफताना बोलत होते.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, नात्यातला गोडवा जपला पाहिजे. शिक्षणाबरोबर अध्यात्माची आवड आपण जपली पाहिजे. प्रत्येक विज्ञानाच्या पाठीमागे अध्यात्म दडलेल असते. ‘जय किसान’ने वसंतदादांच्या स्मृतींना उजाळा देत चालवलेला ३२ वर्षांचा उपक्रम हा एक आविष्कार आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी शामराव पाटील, शंकरराव चव्हाण, राजश्री एटम, मंडळाचे संस्थापक व पं. स. सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, सचिव कालिदास पाटील, शंकर पाटील उपस्थित होते. डॉ. राजेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले.