कोकरुड : मुलगा पाहायला आलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी वधू-वर सूचक केंद्राच्या संचालिकेस धारेवर धरत, मुलास शिव्यांची लाखोली वाहत परतीचे प्रवासभाडे घेत पुणे गाठले. ही घटना येळापूर (ता. शिराळा) येथे सोमवारी घडली. या वादात ग्रामस्थांची चांगलीच करमणूक झाली.येळापूर (ता. शिराळा) येथे वधू-वर सूचक केंद्रात सोमवारी मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पुणे येथून मुलगी, तर मिरज येथून मुलगा येणार होता. दोन्ही बाजूकडून दुपारची वेळ ठरवण्यात आली होती. मुलगा मिरज येथे रेल्वेत अधिकारी असून तो सेवानिवृत्तीकडे आला आहे, तर मुलीचे हे दुसरे लग्न होते. दुपारी एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता. मात्र मुलगी सायंकाळी सहापर्यंत न आल्याने मुलगा वधू-वर सूचक केंद्राच्या संचालिकेस न भेटता परस्पर निघून गेला. मुलगी नातेवाईकांसह सायंकाळी सात वाजता पोहोचली.मुलगा दिसेना म्हणून केंद्राच्या संचालिकेने भ्रमणध्वनीवर संपर्क केला. व्हीडिओ कॉल करून मुलगी दाखवली. मात्र त्याने परत येण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मुलीकडून आलेल्या महिलांनी संचालिकेला धारेवर धरले. मुलाच्या घरी घेऊन चला अथवा आम्हाला प्रवासभाडे म्हणून दहा हजार द्या, असा ठेका धरला. संचालिकेने पैसे नसल्याचे सांगताच महिला पुन्हा संतापल्या.रात्री दहापर्यंत हा गोंधळ सुरू होता. अखेर कोकरुड पोलीस ठाण्याचे पथक हजर झाल्याचे दिसताच मुलीकडील महिला चार हजार घेऊन मुलगा आणि केंद्राच्या संचालिकेला शिव्या देत, बोटे मोडत परत गेल्या. गावात तब्बल तीन तास या लग्नाबद्दल भांडण, शिवीगाळ, पाठलाग, फोनाफोनी सुरु असल्याने गावकऱ्यांची मोठी करमणूक झाली.
वधूला झाला उशीर...वराचा पोबारा!, व्हीडिओ कॉल करून मुलगी दाखवली पण..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:07 PM