इस्लामपूर : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांसाठी बेडही उपलब्ध नाहीत. बहुतांशी कोविड रुग्णालयांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. संबंधित डॉक्टर नातेवाईकांनाच इंजेक्शन उपलब्ध करून द्यायला सांगतात. त्यामुळे नातेवाईक हवालदिल होऊन धावाधाव करत आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीष्ठाता नरसिंग देशमुख यांनी मात्र सांगितले की, हे इंजेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाचीच आहे.
सध्या वाळवा तालुक्यात एकूण १२ कोविड सेंटर आहेत. यामध्ये ४४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी कोविड सेंटरवरील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी नातेवाईकच आग्रह करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इंजेक्शन उपलब्ध करून द्या, असा सल्ला देऊन डॉक्टर रिकामे होतात. त्यानंतर नातेवाईक पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकापासून स्थानिक लोकप्रतिनिधींपर्यंत या इंजेक्शनबाबत चौकशी करत आहेत. त्यांच्याकडेही त्याची उत्तरे नसल्याने नातेवाईक हवालदिल होतात.
रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली अन्न व औषध प्रशासन यंत्रणा कार्यरत आहे. ज्या रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहे, त्या रुग्णालयाने रुग्णाच्या नावाची आणि आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद करायची आहे. त्यानंतर इंजेक्शनच्या उपलब्धतेनुसार त्याचे वितरण संबंधित रुग्णालयापर्यंत होते. रुग्णांच्या नातेवाईकांना या प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने तसेच रुग्णालयातूनही योग्य ती माहिती दिली जात नसल्याने नातेवाईक तणावात आहेत.
कोट
रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णासाठी जादूची कांडी आहे, असे वाटते. त्यामुळे या इंजेक्शनविषयी नातेवाईकांचाच अट्टाहास असतो. डॉक्टरांनीही नातेवाईकांना याबाबत योग्य सल्ला द्यावा. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा त्याबाबतचा अट्टाहास कमी होईल.
- डॉ. नरसिंग देशमुख, अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर