लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांची शासनाने तातडीने मुक्तता करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले.
कमी लोकांसह बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीचा संकल्प केल्या होता. राज्य सरकारने कराडकर यांना स्थानबद्ध केले आहे. कराडकर यांना स्थानबद्ध करणे उचित नसून त्यांची त्वरित मुक्तता करावी, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली.
नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या की, पंढरपूर पोटनिवडणुकीत मंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो लोकांचे मेळावे झालेले चालतात, मंत्र्यांच्या सभांमुळे कोरोनाचा प्रसार होत नाही; पण महाविकास आघाडी सरकारने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वारीवर बंदी घातली आहे.
यावेळी अजयकुमार वाले, श्रीकांत शिंदे, बाळासाहेब बेलवलकर, अविनाश मोहिते, मोहन जामदार, गणेश कांबळे उपस्थित होते.