सांगली : गेल्या पाच वर्षापासून बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या हाती असणारे जिल्ह्याचे प्रभारी पालकत्व आता संपणार आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद येणार असून, जयंत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारे विकास कामांसाठी पालकमंत्रीपद महत्वाचे आहे.
गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीची अखेर सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातून जयंत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप बाकी असला तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाटील यांच्याकडेच जबाबदारी येणार, हे निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातीलच नेत्याला हे महत्त्वाचे पद मिळणार आहे.
महायुतीच्या कालावधित गेल्या पाच वर्षापासून सुरुवातीला कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील व त्यानंतर सोलापूरच्या सुभाष देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. मात्र, जिल्ह्यातील कामकाजात अपवाद वगळता त्यांचा सहभागच जाणवत नसे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी आल्यानंतर, तातडीने आपापल्या जिल्ह्यात परत जाण्यासाठी त्यांची लगबग असे. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील प्रश्न तडीस नेण्याबाबतही दोघांची धडपड अपवादानेच दिसून आल्याने, जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
नव्या सरकारमध्ये पालकमंत्री पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे येणार हे निश्चित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देताना पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. जिल्हा परिषदेसह अन्य यंत्रणांना द्यावयाचा निधी, त्याचा विनियोग यासह पायाभूत सुविधांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठीही पालकमंत्री महत्वाची भूमिका बजावत असल्याने, जिल्ह्यातील मंत्र्याकडे पालकत्व असणे आवश्यक असते. ती अपेक्षा आता पूर्ण होणार आहे.
पतंगरावांची कामगिरी 'लय भारी'!
आघाडी सरकारच्या कालावधित पतंगराव कदम यांच्याकडे कोणत्याही विभागाचे मंत्रीपद असले तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री पद मात्र कायम होते. यामुळेच त्यांची जिल्ह्यातील ओळख पालकमंत्री अशीच होती. अधिकाऱ्यांना केवळ सूचना न देता, त्याक्षणीच आदेश देत काम मार्गी लावण्यात पतंगरावांचा हातखंडा होता. जिल्हा नियोजनच्या बैठकांतही चर्चेचे गुहाळ ठेवता जागच्या जागी निर्णय घेत समोरच्याला दिलासा मिळत असल्याने, पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच ठरली होती.