सांगली : संपूर्ण राज्यात गाजलेल्या शहरातील रिलायन्स ज्वेल्स दरोडाप्रकरणी पोलिसांनी अखेर एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनीच यापूर्वी जाहीर केलेल्या पाच संशयित सोडून वेगळ्याच संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला का याबाबतही माहिती मिळाली नाही. अंकुरप्रताप रामकुमार सिंग (वय २५, रा. तारवान, जि. पाटणा, बिहार) असे संशयिताचे नाव आहे.शहरातील मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्सवर ४ जून २०२३ मध्ये धाडसी दरोडा टाकत सहा कोटी ४४ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. सुरुवातीच्या फिर्यादीत ही रक्कम १४ कोटींवर होती मात्र, नंतर ज्वेल्सच्या व्यवस्थापनाने साडेसहा कोटींचीच फिर्याद दिली होती.भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून ही लूट करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली होती. यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असला तरी त्यात यश आले नव्हते. यानंतर दोन ते तीन वेळा पोलिसांची पथके बिहारसह अन्य राज्यांत तपासासाठी गेली होती. यानंतर झालेल्या तपासात पोलिसांनी पाच संशयितांची नावे जाहीर केली होती. या संशयितांचा तपास अजून सुरू असतानाच, पोलिसांनी नवीनच व्यक्तीला ओडिशा येथून ताब्यात घेतले आहे.या पथकाने बिहारसह गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणासह राज्यातील आठ जिल्ह्यांत तपास सुरू केला होता. याच वेळी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयित सिंगची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ओडिशा राज्यातील बारगड जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. ताब्यात घेतलेला संशयित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
‘या’ संशयितांचा शोध कधी?पोलिसांनी यापूर्वी केलेल्या तपासात गणेश भद्रावार (रा. हैदराबाद, तेलंगणा), प्रताप अशोकसिंग राणा (रा. वैशाली, बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (रा. हुगळी, पश्चिम बंगाल), प्रिन्सकुमार सिंग (रा. वैशाली, बिहार) यांची नावे जाहीर केली होती. पण, यातील कोणत्याही संशयिताला पोलिसांनी पकडलेले नाही.नेमका सहभाग काय?ताब्यात घेतलेल्या संशयिताचा सहभाग असल्याचे समोर असले तरी पूर्वी त्याचे नाव यात आले नव्हते. त्यामुळे या दरोडा प्रकरणात त्याचा नेमका काय सहभाग याबाबतची माहिती मिळू शकली नाही. देशभरातील टोळ्यांची माहिती घेऊन पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले असले तरी त्याचा सहभाग मात्र त्यांनी स्पष्ट केलेला नाही.