सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची तेलंगणातील दक्षिण दिग्विजय मोहिम उत्साहात पार पडली. शिवरायांच्या येथील विजयाच्या स्मृतींना यानिमित्ताने उजाळा देण्यात आला.हैद्राबाद येथील भाग्यलक्ष्मी माता मंदिर ते किल्ले गोवळकोंडा दरम्यान मोहीम पार पडली. मोहिमेत प्रमुख पाहुणे म्हणून सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक तसेच त्यांचा परिवार, पानीपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील, भाग्यनगर गणेश उत्सव समितीचे सरचिटणीस डॉ भगवंत राव, भाजपचे नेते सतीश अग्रवाल सहभागी झाले होते. ज्या तलवारीने येसाजी कंक यांनी साडे तिनशे वर्षांपूर्वी गोवळकोंडा येथे हत्ती मारून इतिहास घडवला तीच तलवार कंक परिवारासोबत माेहीमेत होती.
इमलीबन पार्क येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भाग्यलक्ष्मी माता मंदिर येथे देवीचे दर्शन व आरती करुन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. भुदेवी माता मंदिर, बेगम बाजार छत्री, चुडी बाजार, जुम्मेरात बाजार, पुराना पुल, जियागुडा, रंगनाथ स्वामी मंदिर, कमेला, केसरीया हनुमान मंदिर, जैन मंदिर, दरबार मैसमा मंदिर, रामसिंगपुरा, लंगर हाऊस, छोटा बाजार मार्गे किल्ले गोवळकोंडा येथील येलमा देवीचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत, सरसेनापती येसाजी कंक यांना अभिवादन करून मोहिमेची सांगता करण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन चौगुले म्हणाले की, सरनोबत येसाजी कंक यांना यंदाची मोहीम समर्पित करीत आहोत. सिद्धार्थ कंक म्हणाले, ४ फेब्रुवारी १६७७ नंतर म्हणजे तब्बल ३४७ वर्षांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार सरसेनापती येसाजी कंक यांच्या पराक्रमाच्या स्थळी भेट देण्याचे भाग्य शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या मोहिमेमुळे पुन्हा मिळाले.
तेलंगणात मोहिमेवर पुष्पवृष्टीपदयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी स्थानिक शिवभक्तांकडून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. स्थानिक शिवभक्तांकडून मोहिमेतील सहभागी शिवभक्तांसाठी अल्पोपहार, पाणी, सरबतची व्यवस्था करण्यात आली होती.