सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला. मात्र, सादर केलेल्या अहवालातून प्रकरणाची पुष्टी होत नाही व माहितीही अपुरी असल्याने हा अहवाल त्रोटक अहवालाऐवजी सविस्तर माहिती सादर करण्यात यावी, असे मागणी पत्र पोलिसांकडून रुग्णालय प्रशासनास देण्यात आले आहे.
मिरज शासकीय रुग्णाालयातीलच अधिपरिचारक असलेल्या सुमित हुपरीकर याच्यासह अन्य एकास रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलिसांनी पकडले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल पोलिसांना सादर केला; मात्र त्यातील माहिती खूपच त्रोटक असल्याने पोलिसांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील कारवाईस अडचणी येत आहेत.
संशयित हुपरीकर व त्याचा मित्र दाविद वाघमारे हे एक इंजेक्शन ३० हजार रुपयांना बाहेर विकत होते. मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांना सहा इंजेक्शन दिली जात होती. उपचारांवेळी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यासाठीची इंजेक्शन अधिपरिचारक स्वत:कडेच ठेवून घेत होते. यातूनच हा काळाबाजार होत होता.
जादा दराने रेमडेसिविर विकताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशी समितीने फक्त एप्रिलमध्ये १३२ इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती दिली. पोलिसांना पुढील तपासासाठी आवश्यक असलेली माहिती देण्यात आली नसल्याने ती देण्यात यावी असे आता सांगण्यात आले आहे.