सांगली : पलूस तालुक्यातील तुरची फाटा ते पलूस या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार संजयकाका पाटील व आमदार अरुण लाड यांना निवेदन पाठविले आहे. त्यात साखळकर यांनी म्हटले आहे की, आम्ही तुरची फाटा ते पलूस या रस्त्याने प्रवास करीत असताना गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा रस्ता याच अवस्थेत असल्याचे समजले. तुरीची फाटा ते पलूस शहराकडे जाणारा रस्ता फार खराब अवस्थेत आहे. त्यामुळे प्रवास करताना वाहनधारकांना फार त्रास होत आहे. या रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. हा रस्ता गुहागर-विजापूर महामार्गात समाविष्ट करण्यात आला आहे की नाही तेसुद्धा कळत नाही. त्यामुळे आपण तत्काळ याबाबत लक्ष घालून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्हांला आंदोलन सुरू करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तुरची फाटा ते पलूस रस्त्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:28 AM