सांगली : शिक्षण सेवक कालावधी संपवून जे शिक्षक सेवेत कायम झाले आहेत. त्या शिक्षकांना परिविक्षाधीन कालावधी मंजूर करून घेण्याची अट जिल्हा परिषदेन रद्द केली आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, परिविक्षाधीन कालावधी हा नोकरीच्या सुरुवातीस सलग एक वर्ष समाधानकारकरित्या काम केल्या नंतर मंजूर केला जातो. त्यानंतर सदर शिक्षकांना कायम केले जाते. पण ज्या शिक्षकांची कायम नोंद सेवा पुस्तकात झाली आहे अशा शिक्षकांना पुन्हा परिविक्षाधीन कालावधी मंजूर करून घेण्याचा अट्टहास न करता ती अट रद्द करावी, अशी मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार होऊन जे शिक्षक कायम झालेले आहेत, तशी सेवा पुस्तकात नोंद आहे, अशा शिक्षकांना परिविक्षाधीन कालावधी मंजूर करून घेण्याची अट रद्द करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी घेतला आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे, नंदकुमार कोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गुरव आदी उपस्थित होते.