फोटो ओळी : शहरातील जलवाहिन्या बदलण्याबाबत शिवसेनेच्यावतीने उपमहापौर उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मानसी शहा, स्वप्नाली कुरळपकर, मुमताज मुजावर, विदुला मेहता, पंडितराव बोराडे, जितेंद्र शहा उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होतो. गावभाग, खणभाग, जामवाडी, शंभरफुटी रस्ता, काॅलेज काॅर्नर या गावठाण परिसरात ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या आहेत. अनेक ठिकाणी या जलवाहिन्यांना गळती लागली असून संपूर्ण गावठाण परिसरातील जलवाहिन्या बदलण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी करण्यात आली.
याबाबत उपमहापौर उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. १९५० साली तत्कालीन नगरपालिकेने गावठाण परिसरात जलवाहिन्या टाकल्या होत्या. त्याला ७० वर्षांचा कालावधी लोटला असल्याने या वाहिन्या जमिनीमध्ये फुटून नागरिकांना गढूळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. एकीकडे महापालिकेने शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ७० एमएलडीचा प्रकल्प उभा केला आहे. पण नागरिकांच्या घरापर्यंत हे शुद्ध पाणी पोहोचत नाही. त्यासाठी गावठाण परिसरातील सर्वच जलवाहिन्या बदलण्यात याव्यात. त्यासाठी १०० ते १२५ कोटी रुपयांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी स्वप्नाली कुरळपकर, मानसी शहा, मुमताज मुजावर, विदुला मेहता, अनिता पाटील, सोनाली कुलकर्णी, संगीता शिंदे, स्नेहल जाधव, रावसाहेब घेवारे, पंडितराव बोराडे, प्रसाद रिसवडे, जितेंद्र शहा, लक्ष्मण वडर, प्रकाश लवटे, अविनाश घोगरे, प्रमोद भोसले उपस्थित होते.