सांगली : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची बदली झाल्याचे वृत्त गुरुवारी दुपारनंतर सोशल मीडियातून पसरले. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अनेकांनी दूरध्वनी करून बदलीबाबत खात्रीही केली. कापडणीस यांची बदली झाली आहे, पण ते कापडणीस चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आहेत. दोघांच्या नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ उडाला होता.
नितीन कापडणीस यांचा आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. अजून एक वर्ष बाकी आहे. त्यातच काहीजण त्यांच्या बदलीसाठी वारंवार मुंबईच्या फेऱ्या करत आहेत. गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर नितीन कापडणीस यांची बदली झाल्याची पोस्ट व्हायरल झाली. अनेकांनी त्यावर कमेंटही केली. आयुक्तांच्या कारभाराविरोधात नाराज असलेले बदलीच्या निर्णयावर खूश झाले. पण त्यांची बदली झाली नसल्याचे समजताच अनेकांचा हिरमोडही झाला.
शासनाच्यावतीने नितीन राजाराम कापडणीस यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची चाळीसगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून धुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचे नाव एकच असल्याने सांगलीच्या आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा रंगली. पण सायंकाळी या चर्चेला पूर्णविराम मिळाला. तसेच दोन्ही अधिकारी एकाच गावचे असून यापूर्वीची त्यांच्या नावातील साधर्म्यामुळे अनेकदा गोंधळ उडाल्याची माहिती मिळाली.