सांगली : शहरातील टिंबर एरिया परिसरातील दीड एकर खुल्या भूखंडावर रमाई आंबेडकर उद्यान विकसित करण्यात येत आहे. या उद्यानात भीमा-कोरेगाव क्रांतीस्तंभाची प्रतिकृती, कारंजा, प्राण्यांच्या प्रतिकृती उभारण्यास गुरुवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी ९५ लाख रुपयांची निविदा काढण्यासही सदस्यांनी मान्यता दिल्याचे सभापती पांडुरंग कोरे यांनी सांगितले.
कोरे म्हणाले, टिंबर एरिया परिसरात महापालिकेचा दीड एकराचा भूखंड आहे. या भूखंडावर उद्यान, भीमा-कोरेगाव येथील क्रांती स्तंभाची प्रतिकृती, माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा, कारंजासह भव्य उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचा ७ कोटी २१ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात ९५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यास स्थायी समिती सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. महापालिका समाजकल्याण समितीमधून हा निधी खर्च केला जाणार आहे. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी उद्यान विकासासाठी प्रयत्न केल्याचे कोरे यांनी सांगितले.
चौकट
आधी स्तंभ, मग उद्यान
सभेत क्रांतीस्तंभ वगळून उद्यान विकसित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव होता, पण विरोधी नगरसेवक शेडजी मोहिते, मंगेश चव्हाण, करण जामदार यांनी त्याला विरोध केला. आधी क्रांतीस्तंभ उभारा, मगच उद्यानाचे काम करा, अशी भूमिका घेतली. क्रांतीस्तंभ न उभारण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी केला.