सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा वर्षप्रारंभानिमित्त येथील मारुती चौकातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर ती सांगलीकरांना पाहता येणार आहे. सायंकाळी रोषणाई, आतषबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि शिवप्रेमींनी संयुक्तपणे उपक्रम राबवला आहे.
पाटील म्हणाले, स्वराज्याची राजधानी रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती विख्यात कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. ३० फूट उंच प्रतिकृती इतिहासाची आठवण जागवणार आहे. दुर्गराज रायगडावर आपण पोहचलो आहोत, असा प्रत्यय येईल. गायक अवधूत आळंदीकर यांचा भक्ती शक्ती संगम हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहापासून कार्यक्रम सुरु होतील.
अखंड शिवज्योत पूजन, शिव शपथविधी होईल. त्याआधी सकाळी सात वाजता पाच नद्यांच्या पाण्याचे पूजन आणि महाराजांना अभिवादन करून सांगलीकरांनी महादरवाजा दर्शन सुरु होईल. रात्री आकर्षक आतषबाजी, लेझर शो होणार आहे. गेल्यावर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टतर्फे शिवराज्याभिषेक दिनी अखंड शिवज्योत प्रज्वलित केली होती. त्यानंतर हा लक्षवेधी सोहळा होतो आहे.यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रा. पद्माकर जगदाळे, डॉ. संजय पाटील, ऋषिकेश पाटील, सतीश साखळकर, बिपीन कदम, नितीन चव्हाण, रवी खराडे, आसिफ बावा आदसोबत संयोजनाबाबत बैठक झाली.