सांगली : जाणीवपूर्वक कोणाच्याही फायली मी अडविलेल्या नाहीत. तरीही गेल्या काही महिन्यांपासून नगरसेवकांकडून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. त्याबाबतचा अहवाल मी राज्य शासनाकडे पाठविला आहे, अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत मी ५ हजार १९२ फायलींवर सह्या करून त्या मार्गी लावल्या आहेत. जवळपास २00 कोटींच्या घरात विकासकामे या माध्यमातून झाली आहेत. तरीही सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांकडून चुकीच्या पद्धतीने आरोप केले जात आहेत. यापूर्वी एवढी कामे झाली होती का? दिवसा अठरा तासाहून अधिक काळ कामे करून सर्वच सदस्यांची कामे मार्गी लावली. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या ड्रेनेज, पाणीपुरवठ्यासारख्या योजना गतिमान केल्या. प्रत्येकवेळी विकासकामांच्या फायली मी अडवत असल्याचे खोटे आरोप केले जातात. यासाठी आंदोलने, महासभांमध्ये चुकीची आगपाखड होते, हे योग्य नाही. हा एकप्रकारे दबावतंत्राचा भाग आहे. अशा गोष्टींमुळे प्रशासनाला काम करताना अडचणी येत आहेत. याशिवाय बदनामीही होत आहे.नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रभागात ६ कोटी १४ लाख रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रभागात सव्वाचार कोटी, तर जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रभागात साडेचार कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. आता फक्त जुन्या सात फायली माझ्या कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्याही मी लवकरच मार्गी लावतो, असे सांगितले आहे. काही नगरसेवकांनी माझ्याकडे आलेल्या फायलींबाबत तक्रारी केल्या आहेत. काही कामांच्या फायली अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका नेत्याची फाईल अशाचप्रकारच्या अडचणीमुळे मी अडविली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार गंभीर आहे.कोणतीही फाईल माझ्याकडे आली तर ती कोणाची आहे हे न पाहता फक्त नकाशा आणि फोटो एवढेच पाहतो. कोणत्याही कामाच्या अंदाजपत्रकाची जबाबदारी ही शहर अभियंत्यांवर असते. त्यात जर चुका असतील तर त्याच्यावर कारवाई करू. इतक्या पद्धतशीरपणे प्रक्रिया सुरू असताना नेमका अकांडतांडव कशासाठी सुरू आहे, हे कळत नाही. सह्या न करता मी पैसे गोळा केले असते, तर हा दंगा ठीक होता. पण नाहक बदनामीचे षड्यंत्र योग्य नाही. यामुळे मी या सर्व गोष्टींचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. शासन योग्य निर्णय घेईल, असेही खेबूडकर यांनी स्पष्ट केले.सुरेखा कांबळेंच्या फायली मार्गीप्रलंबित फायलींच्या प्रश्नावर डोके फोडून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांच्या सर्व जुन्या फायली मार्गी लावल्या आहेत. आता त्यांच्याकडून नव्याने काही फायली आल्या आहेत. निधी आणि तरतूद पाहून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. कामाच्याबाबतीत मी कधीही पक्षपातीपणा केलेला नाही. त्यांनी यापूर्वी कधी तक्रार केली नव्हती. त्यामुळे मला त्याची माहिती नाही, असे महापालिका आयुक्त खेबूडकर म्हणाले.