सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातील रेमडेसिविर चोरून त्याचा काळाबाजार करणाऱ्या सुमित सुधीर हुपरीकर आणि दाविद सतीश वाघमारे यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिव्हिल प्रशासनाने सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल बुधवारी सादर होणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
संशयित हुपरीकर हा मिरज शासकीय रुग्णालयात ब्रदर आहे, तर वाघमारे हा खासगी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. हे दोघेजण रेमडेसिविरचा काळाबाजार करीत होते. एक इंजेक्शन ते ३० हजार रुपयांचा विकत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. पोलिसांनी विलिंग्डन महाविद्यालयाजवळ सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शन सापडले. यापूर्वी त्यांनी ८९९ रुपयांचे इंजेक्शन तीस हजारांना विकल्याची कबुलीही दिली आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलच्या उपलब्ध साठ्यातून प्रतिव्यक्ती सहा डोस दिले जातात. त्यानंतर उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास शिल्लक राहिलेले डोस ब्रदर त्यांच्याच ताब्यात राहतात. त्यातील शिल्लक राहिलेले रेमडेसिविर हुपरीकर आणि त्याचा मित्र दाविद हे दोघे गरजू रुग्णांना जादा दराने विक्री करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर सिव्हिल प्रशासनाने तातडीने चौकशी समिती नियुक्त केली. या समितीचा अहवाल बुधवार, २८ रोजी प्राप्त होणार आहे.