सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायाची व्याप्ती राज्यभरात असल्याने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीच्या फिर्यादी दाखल कराव्यात, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. गुन्हे दाखल करुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, तर वरिष्ठांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यामध्ये राज्यभरातील ८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची ५00 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप कडकनाथ कोंबडी पालन करणाºया शेतकºयांकडून होत आहे. त्यामुळे कंपनी संचालकांविरुध्द दिवसागणिक संतापाची भावना वाढीस लागत आहे. वेगवेगळ्या पध्दतीने खुलासे करुन कंपनी संचालकांकडून शेतकºयांना शांत करण्याची उठाठेव सुरु आहे. मात्र संतप्त शेतकरी आता ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.माजी खासदार शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, कागल या तालुक्यात दौºयावर असताना त्यांच्याकडेही पाचशेहून अधिक शेतकºयांनी तक्रारी सांगितल्या. या कंपनीचे मुख्य कार्यालय इस्लामपूर येथे असले तरी, राधानगरी, कागल तालुक्यातील व्यवहार तेथील स्थानिक कार्यालयातील एजंटामार्फत झालेले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी तक्रारीसाठी इस्लामपूरकडे न येता स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.संबंधितांवर कारवाईची मागणीदरम्यान, शेट्टी यांनी यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला असता, त्यांना गुन्हे दाखल करुन घेण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाºयांचे मार्गदर्शन घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. ३० आॅगस्टरोजी महापूरग्रस्त आणि शेतकºयांच्या मागण्यांसाठी काढण्यात येणाºया मोर्चानंतर या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घालणार आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याविषयी मागणी करणार आहे, असे ते म्हणाले.
‘कडकनाथ’प्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:32 AM