सांगली/मिरज : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील खराब रस्तेप्रश्नी सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी आक्रमक भूमिका घेत, या खराब रस्त्यांना लोकप्रतिनिधींची नावे देऊन त्यांचे नामकरण केले. या अनोख्या आंदोलनाबरोबरच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी चौका-चौकात प्रथमोपचाराच्या पेट्याही लावण्यात आल्या.
कृती समितीचे गेल्या दोन महिन्यापासून रस्ते दुरुस्तीसाठी आंदोलन सुरु आहे. जिल्हाधिकारी विजय काळम यांनी या आंदोलनाची दखल घेऊन रस्तेप्रश्नी बैठक घेतली. ३० डिसेंबर २०१७ पूर्वी रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले. पण या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने कृती समितीने सोमवारी महापालिका क्षेत्रातील खराब रस्त्यांना लोकप्रतिनिधींची नावे देऊन जिल्हा प्रशासन, शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
वालचंद महाविद्यालय ते स्फूर्ती चौकास आ. सुधीर गाडगीळ मार्ग, शंभरफुटी रस्ता ते कोल्हापूर रस्ता हा मंत्री नितीन गडकरी मार्ग, शामरावनगर चौकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्ग, टिळक चौकास आ. पतंगराव कदम मार्ग, त्रिमूर्ती चित्रमंदिर चौकास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील मार्ग, स्टेशन चौक मार्गास उपमहापौर विजय घाटगे मार्ग, मार्केट यार्डसमोरील हॉटेल शिवेच्छा ते किसान चौक मार्गास नगरसेवक जगन्नाथ ठोकळे मार्ग, तर कुपवाडच्या नवीन महापालिका इमारतीजवळच्या रस्त्याचे शेडजी मोहिते मार्ग असे नामकरण करण्यात आले. तसेच मिरजेत दिंडी वेस ते सुभाषनगर या रस्त्याला आ. सुरेश खाडे यांचे, बसस्थानक ते अमरखड्डा रस्त्याला महापौर हारूण शिकलगार यांचे व कृष्णाघाट रस्ता ते शास्त्री चौक व रेल्वेस्थानक या रस्त्यांना साहेब, दादा, अण्णा, भाई, बापू अशी लोकप्रतिनिधींची टोपणनावे देऊन नामकरण केले.
आंदोलनात कॉ. उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर, डॉ. संजय पाटील, गौतम पवार, युसूफ ऊर्फ लालू मेस्त्री, संदीप दळवी, शेरसिंग धिल्लो, आशिष कोरी, नितीन चव्हाण, आश्रफ वांकर, अमर पडळकर, अनिस व्यास, अमोल कोकाटे, मोहसीन मुश्रीफ, मेहेबूब कादरी, लखन लोंढे, सागर हंडीफोड, गणेश मोतुगडे, अफजल बुजरूख, अभिजित चौगुले, अमजद जमादार, किरण कांबळे, जावेद मुल्ला, फिरोज बेग, गणेश तोडकर सहभागी होते.नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबाशहरातील खराब रस्त्यांकडे दुर्लक्ष करणाºया प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी त्यांच्या नावाचे फलक लावून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात नागरिकही सहभागी झाले होते. शहरातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागणी करुनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून याची दखल घेतली जात नसेल, तर आंदोलन तीव्र करावे. या आंदोलनास आपला पाठिंबा राहील, असे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले.मोदींचे नाव वाचले...सांगली-पेठ या रस्त्यालाही ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रुतगती मार्ग’ असे नाव देण्याचे नियोजन सर्वपक्षीय कृती समितीने केले होते. त्यानंतर या नियोजित आंदोलनाचा धसका शासनाने व मंत्र्यांनी घेतला आणि तातडीने हा रस्ता केंद्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला. रस्ता वर्ग होऊन लगेचच डांबरीकरणाच्या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली. याच रस्त्यामुळे सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीचे रस्तेविषयक आंदोलन सुरू झाले होते.
सांगली शहराशी जोडणारा हा रस्ता सर्वात खराब होता. आता पॅचवर्कने तात्पुरती डागडुजी केली आहे. लवकरच डांबरीकरणाचे काम सुरू होणार आहे. या रस्त्याची कामे मार्गी लागल्याने समितीने आंदोलनातून हा रस्ता वगळला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे नाव या अनोख्या आंदोलनातून वाचले.