बागणी : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सरोजिनी बाबर यांचा जन्मदिन ‘लोकसाहित्य दिन’ म्हणून जाहीर करावा, त्यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात यावा, त्यांचे सर्व साहित्य पुनर्प्रकाशित करावे, यासह विविध मागण्या बागणी परिसरातील नऊ ग्रामपंचायती व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, बागणीचे सरपंच संतोष घनवट, परिषदेचे माहिती व तंत्रज्ञान राज्य प्रमुख अमित कुदळे, सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव, कार्याध्यक्ष मनीषा पाटील, सचिव विनायक कदम यांनी हे निवेदन प्रशाकीय उपजिल्हाधिकारी गणेश शिंदे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, डॉ. सरोजिनी बाबर या बागणी (ता. वाळवा) येथील लोकसाहित्याच्या, लोकगीतांच्या, लोककलांच्या अभ्यासक, संग्राहक व स्वातंत्र्य चळवळीत योगदान असणाऱ्या विद्वान व व्यासंगी महिला होत्या. आमदार व खासदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी ३५८ ग्रंथांची निर्मिती करून साहित्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ७ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन ‘लोकसाहित्य दिन’ म्हणून जाहीर करावा. तसेच त्या दिवशी दरवर्षी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या संस्थेस अथवा व्यक्तीस ‘डॉ. सरोजिनी बाबर जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करावे. त्यांचे साहित्य महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुनर्प्रकाशित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.