सांगली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट दिली. पुरामध्ये या गावात बोट उलटून 16 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. शर्मिला ठाकरे यांनी गावातील लोकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ब्रह्मनाळ गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, पुरामुळे लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीपासून पूरग्रस्त भागात मदत करत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच सरकारला हात जोडून विनंती आहे की, पूरग्रस्तांसाठी गरजेच्या वस्तू सगळेच मिळून देत आहोत. अनेकांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र पुरामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांच्या घरातलं सामान, जनावरं, माणसे गेली आहेत. संपूर्ण माणूस सरकारला पुन्हा उभा करावा लागणार आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू येतील पण सरकारने पूरग्रस्तांची घरं उभारा असं आवाहन शर्मिला ठाकरेंनी सरकारला केलं आहे.
दरम्यान ब्रह्मनाळ गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारं साहित्य, वह्या, दफ्तरे याचा संपूर्ण खर्च मनसे पक्षाकडून केला जाणार आहे अशी माहिती शर्मिला ठाकरेंनी दिली. सांगली दौऱ्याआधी शर्मिला यांनी कराडमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली.
निसर्ग हा सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यापुढे आपले काहीही चालू शकत नाही. अतिवृष्टी अन् महापूर ही मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. सरकारचे प्रयत्न त्यापुढे पुरूच शकत नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळेच मनसे पूरग्रस्तांबरोबर आहे असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.
पुरामध्ये अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झालं आहे. पूर ओसरल्यानंतर ही घरं धोकादायक झाली आहे. त्यामुळे सरकारने त्यांना पक्की घरं उभारुन द्यावी असं आवाहन शर्मिला ठाकरे यांनी केलं आहे.