ओळी : महापालिकेच्या वीज बिल घोटाळाप्रकरणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या वीज बिलात घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत महापालिकेने महावितरणकडे धनादेशाद्वारे भरलेल्या वीज बिलांची माहिती मागविली आहे. तसा आदेश गुरुवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बैठकीत दिला. येत्या १५ दिवसांत अहवाल आल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
महापालिकेच्या वीज बिलात १.२९ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतरही महापालिकेने या रकमेच्या वसुलीबाबत महावितरणकडे पाठपुरावा केला नसल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर महापौर सूर्यवंशी यांनी महापालिका व महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला उपायुक्त राहुल रोकडे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, स्थायी सभापती पांडुरंग कोरे उपस्थित होते.
यावेळी एक कोटी २९ लाख रुपयांच्या वीज बिल घोटाळ्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर घोटाळ्याची रक्कम अधिक असल्याची शक्यता वर्तवीत महापौर सूर्यवंशी यांनी गेल्या पाच वर्षांतील ६५० वीज बिलांची माहिती महावितरणकडून मागविली. या बिलाची पडताळणी झाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत झाला. दरम्यान, महावितरण कंपनीने या घोटाळ्यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न चालविला असल्याची चर्चा बैठकीत होती.
बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आशिष मेहता, महापालिका विद्युत अभियंता अमर चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक अनिल चव्हाण, मुख्य लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, वि.द. बर्वे उपस्थित होते.