सांगली : काल, मंगळवार पहाटेपासून सांगलीत वावरत असलेल्या गव्याचे रेस्क्यू ऑपरेशन अखेर १८ तासानंतर पूर्ण झाले. मार्केट यार्डमध्ये घुसलेल्या गव्यास कोणतीही इजा न होता पकडण्यासाठी उभ्या केलेल्या खास वाहनात त्याने रात्री प्रवेश केल्यानंतर टिममधील सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गव्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर सकाळी त्यास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. पण, मंगळवारी दिवसभर गव्याचा थरार सांगलीकरांनी अनुभवला. गेल्या दोन दिवसांपासून कसबे डिग्रज, सांगलीवाडी परिसरात वावरत असलेला गवा मंगळवारी पहाटेच्या सुमारास सांगली शहरात आला. वखारभागातून कॉलेज कॉर्नरजवळून तो मार्केट यार्ड परिसरात आला. तोपर्यंत वनविभाग, पोलिसांसह सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यास पकडण्यासाठी मोहिम सुरू केली होती. सुरूवातीला मार्केट यार्डचे सर्व दरवाजे बंद करून आतच त्यास पकडण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी खास वन्यजीव विभागाचे वाहनही बोलाविण्यात आले. सुरूवातीला इंजेक्शनव्दारे त्यास बेशुध्द करून पकडण्याचा विचार करण्यात आला.मात्र, त्याच्या वापराची गरज नसल्याचे व त्यामुळे शांत असलेला गवा अधिक आक्रमक होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्ती केली. त्यामुळे इंजेक्शनचा पर्याय टाळून तो सुरक्षितपणे वाहनात जाईल अशी व्यवस्था करण्यात आली. अखेर गवा रात्री दोनच्या सुमारास वाहनात गेला. सकाळी त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सांगलीत ‘गवा रेस्क्यू ऑपरेशन’ वीस तासानंतर यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 12:16 PM