सांगली : मुंडे भगिनींनी व्यक्त केलेली नाराजी म्हणजे पक्षद्रोह नव्हे. त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याचा, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे मत भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, राज्यातील ठाकरे सरकार रक्तपिपासू वृत्तीचे असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
शेलार म्हणाले की, ठाकरे सरकार कोरोना स्थितीत केवळ राजकारण करीत आहे. केंद्राकडे बोट करून स्वत:चे गैरनियोजन लपवीत आहे. यात लोकांचा बळी जात असतानाही त्यांना त्याचे गांभीर्य नाही. हे सरकार रक्तपिपासू वृत्तीचे बनले आहे. कोरोनासह आरक्षण, शेतकरी पीक विमा, कर्जमाफी, तरुणांची आत्महत्या, बेरोजगारी अशा प्रत्येक प्रश्नावर अपयशी ठरले आहे.
सरकारमध्ये आपसांत असलेले मतभेद लपून राहिले नाहीत. हे सरकार पडावे म्हणून कुणी प्रयत्न करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीच्या कर्मानेच त्यांचे सरकार पडेल. हे सरकार असेपर्यंत कोरोना नियंत्रित येण्याची चिन्हे नाहीत. लसीकरणावरून राज्य शासनाची केंद्र शासनावर होणारी टीका चुकीची आहे. त्यांनी किती लसी केंद्राकडून घेतल्या, किती वाया घालविल्या याचा हिशेब द्यावा, असे ते म्हणाले.
चौकट
सर्कलचा मुद्दा चुकीचा आहे.
फडणवीस सर्कलमध्ये मुंडे भगिनी नसल्याने त्यांना मंत्रिपद दिले नाही, अशी टीका होत असल्याबद्दल शेलार यांना विचारले असता ते म्हणाले, या गोष्टी चुकीच्या आहेत, मात्र मुंडे भगिनींनी त्यांची नाराजी व्यक्त करणे हे चुकीचे नाही.