आटपाडी : ओबीसी आरक्षण बचावासाठी आटपाडी तालुक्यामध्ये कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. या मोर्चावेळी आटपाडी शहरातील व्यापाऱ्यांनी लाक्षणिक बंद पाळत ओबीसी आरक्षण बचावला समर्थन दिले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.गुरुवारी आटपाडी बसस्थानकापासून सुरू झालेला मोर्चा मुख्य व्यापारी पेठेतून पुढे नगरपंचायतमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी नगरपंचायतजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु. टी. जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, यल्लाप्पा पवार, दत्ता पुकळे, प्रवीण सूर्यवंशी, सुमन नागणे, स्नेहजित पोतदार, पंढरीनाथ नागणे, दादासाहेब मोटे, आबा सागर, रणजित ऐवळे आदींची भाषणे झाली.यावेळी वक्त्यांनी मराठा आरक्षणास ओबीसींचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही आमच्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी एकत्र आलो आहोत. कोणाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी नाही. इंदापूर येथे आमदार पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकल्याच्या घटनेच्या निषेध व ओबीसी आरक्षण बचाव यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. काही समाजकंटक वेगळी भाषा बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आळा घालणे गरजेचे आहे. काही समाजकंटकांनी बंदला विरोध दर्शवत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी तहसीलदार सागर ढवळे, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांना निवेदन देत मोर्चाची सांगता झाली.
भुजबळ, पडळकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेकमोर्चा तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचावाचे नेते मंत्री छगन भुजबळ व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षण बचावाच्या घोषणा देण्यात आल्या.