लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेची सर्वसाधारण सभा आज, शनिवारी होत आहे. यामध्ये शहरातील सात ते आठ जागांवरील आरक्षण उठविण्यावर वादळी चर्चा होणार आहे. यापूर्वी तत्कालीन राष्ट्रवादीमधील काहींनी आरक्षणाची भीती दाखवून भूखंड लाटले आहेत. सध्या जागेचे दर गगनाला भिडले आहेत. याचाच फायदा उठविण्यासाठी काही राजकीय तडजोडी झाल्याची चर्चा पालिका वर्तुळातून आहे.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. या कालावधीत काहींनी आपले भूखंड वाचवले. विरोधकांचे भूखंड हेरून त्यावर आरक्षणे टाकली, तर काही मालमत्ताधारकांना आरक्षणाची भीती दाखवून कमी दराने भूखंड खरेदी केले. हेच भूखंड चढ्या भावाने विक्री केले. या व्यवहारात राजकीय मंडळी आणि भूखंडमाफिया कोट्यधीश झाले आहेत. आणेवारीतील बेकायदेशीर भूखंड लाटून त्यांनी कायदेशीररित्या त्यांची विक्री केली आहे, तर काहींनी खोटे दस्तऐवज करून परस्पर भूखंड लाटले आहेत.
आज होणाऱ्या सभेत एकूण ६९ विषय आहेत. आरक्षण उठवणे हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. नियोजित विकास आराखड्यात रस्ते, मैदाने, प्राथमिक शाळा, बगीचा आदी असणारी आरक्षणे उठवण्यासाठी सभागृहात सात ते आठ विषय ठेवले आहेत, तर काही भूखंड ताब्यात घेण्याचे विषय आहेत. या निर्णयाने शहराचा विकास होणार का, हा मुद्दा उपस्थित होणार आहे. पालिकेत भाजप पुरस्कृत सत्ता आहे. राज्यात मात्र राष्ट्रवादीची सत्ता असल्याने सत्ताधारी विकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे पुढे काय होणार, हा मुद्दा राजकीय कळीचा ठरणार आहे.
चौकट
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून
तत्कालीन राष्ट्रवादी सत्तेत असताना ऑगस्ट २०१६ मध्ये नियोजित विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी आली. त्यानंतर चार महिन्यांनी विकास आघाडी सत्तेवर आली. परंतु गेल्या साडेतीन वर्षात अन्यायकारक आरक्षणे उठवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न का झाले नाहीत? आता आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरक्षणे उठवण्यात येत असल्याची चर्चा आहे.
फोटो- नगरपालिका लोगो