भवानीनगर (ता.वाळवा) येथील व्यायामशाळेत असलेले स्वयंपाकाचे साहित्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील व्यायामशाळेत परराज्यातील कामगारांनी वास्तव्य केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. ग्रामपंचायतीने तत्काळ त्यांना बाहेर काढल्याने युवक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
गावची गरज ओळखून तत्कालीन सरंपच धनंजय रसाळ यांनी राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टला दोन गुंठे जागा उपलब्ध करून दिली होती. ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे सहा लाख रुपये खर्चून अद्ययावत व सुसज्ज अशी व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली होती. २०१० मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होऊन व्यायामशाळा ग्रामपंचायतीकडे सुपुर्द केली होती. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अवघ्या सहा महिन्यातच पारधी कुटुंबीयांनी व्यायामशाळेचा ताबा घेतला होता. त्यावेळीही धनंजय रसाळ व तत्कालीन सरपंच विमल कुमठेकर यांनी व्यायामशाळेची देखभाल दुरुस्ती करवून घेतली होती.
सध्या या व्यायामशाळेत रेल्वेच्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करून व्यायामशाळेचे स्वयंपाक घर बनविले होते. त्यामुळे तरुणांचे व्यायाम करणे बंद झाले होते. हा प्रकार गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांना समजताच त्यांनी तत्काळ त्यांना बाहेर काढण्याचे सूचनावजा आदेशच दिला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित त्यांना बाहेर काढून व्यायामशाळा खुली केली आहे.
कोट
व्यायामशाळा व वाचनालये ही युवकांचे आरोग्य व संस्कारांची जडण घडण करीत असतात. त्यांचे पावित्र्य जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यापुढे असे प्रकार व्यायामशाळेत होणार नाहीत आशा सूचना दिल्या आहेत.
-शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा पंचायत समिती
कोट
व्यायामशाळेतून परप्रांतीय कामगारांना बाहेर काढून ती मोकळी करण्यास वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सहकार्य केलेबद्दल युवक वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
धनंजय उर्फ दादासाहेब रसाळ, माजी सरपंच, भवानीनगर