राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:42 AM2024-11-14T11:42:42+5:302024-11-14T11:43:27+5:30

जयश्रीताईंनी असे करायला नको होते - बाळासाहेब थोरात 

Resignation and bond were ready, still why rebellion asked Prithviraj Patil  | राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

सांगली : मी आमदार झालो तर पुढील निवडणूक न लढविण्याबाबत पाचशेच्या बाँडवर वचन तसेच शहराध्यक्षपदाचा राजीनामा अशा दोन अटी मला घातल्या गेल्या. त्या पूर्ण केल्या तर जयश्रीताई पाटील अर्ज मागे घेतील, असे सांगण्यात आले. राजीनामा व बाँड दोन्हीही तयार होते; तरीही त्यांनी बंडखोरी का केली, असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीवाडी येथील सभेत उपस्थित केला.

सांगलीवाडीच्या चौकात काँग्रेसची प्रचारसभा पार पडली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्रीताईंनी अर्ज मागे घ्यावा म्हणून मी स्वत: दोन वेळा त्यांना भेटलो. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मला त्यांनी ज्या दोन अटी घातल्या होत्या, त्या मान्य केल्या.

राजीनामापत्र व पाचशे रुपयांचा बाँड तयार ठेवला होता. त्याची कल्पना देऊनही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यांच्या या बंडखोरीमागे नेमके कोण आहे, याचा तपास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जरूर घ्यावा. त्यांना भाजपचा पराभव करायचा आहे की पृथ्वीराज पाटील यांचा हे त्यांनी सांगावे.

माझ्याबरोबर जाऊ नये म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांवर दबाव टाकण्यात आला. सांगलीवाडीतील बहुतांश माजी नगरसेवकांनी हा दबाव झिडकारून मला साथ दिली. लोकांनी ठरविले तर कोणाचे काही चालत नाही. नागरिकांनी विश्वास दिल्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे, असे पाटील म्हणाले.

त्यांनी असे करायला नको होते - बाळासाहेब थोरात 

बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज की जयश्रीताई असा पेच आमच्यासमोर होता. दोन्हीही नेते आमच्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, मागील पाच वर्षांत पृथ्वीराज पाटील यांनी जे काम केले त्याची दखल घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीच पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी निश्चित केली. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महामंडळ तसेच शेवटी विधान परिषद सदस्यत्व देण्याचेही वचनही जयश्रीताईंना दिले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करायला नको होती.

Web Title: Resignation and bond were ready, still why rebellion asked Prithviraj Patil 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.