अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील खासदार राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीची चर्चा रंगू लागली आहे. माने यांनी दिलेल्या झुंजीची धास्ती वाळवा-शिराळ्यात भक्कम असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. यामुळे विधानसभेची चाहूल लागण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंत पाटील आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी बुथ कमिट्यांच्या माध्यमातून मतदार संघात संपर्क वाढवला आहे. या माध्यमातून बालेकिल्ल्याची डागडुजी सुरू केली आहे.
गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादीने अभेद्य ठेवला होता. मात्र शिराळा मतदारसंघात परिवर्तन झाले. येथे भाजपने राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला. हा पराभव आ. पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. वेळोवेळी त्यांनी जवळच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देऊन, या पराभवाची सल किती जिव्हारी लागली, हे स्पष्ट केले होते. त्यानंतर वाळवा-शिराळ्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जिल्हा परिषद, महापालिका आणि इस्लामपूर नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात यश मिळाले. आता त्यांचे ‘टार्गेट’ आमदार जयंत पाटील हेच आहेत. त्यांच्या पराभवासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.स्वत:च्या गटात विभागलेल्यांना एकत्र आणणारजयंत पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चेबांधणीसाठी फिरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बुथ कमिट्यांच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडविण्याविषयी गांभीर्याने विचार केला जात आहे. ज्या ज्या गावात दोन दोन गट सक्रिय आहेत, त्यांना एकत्र करून बालेकिल्ल्याची डागडुजी केली जात आहे.