इस्लामपूर : शहराच्या विकासाची गती कायम राहिली पाहिजे. शहराचा विकास करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच सहकार्य राहील; मात्र आमच्या व्यवहार्य सूचनांचा स्वीकार न झाल्यास आमचा विरोध राहील. कायदेशीर अनियमितता आणि अवांतर खर्चाच्या विषयांना राष्ट्रवादीकडून विरोधच केला जाईल. विरोधासाठी विरोध ही आमची भूमिका असणार नाही, अशी माहिती पालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात कोरे व त्यांच्या पालिकेतील सहकारी नगरसेवकांनी पत्रकारांशी संवाद साधला. १२ एप्रिल रोजी तब्बल १० तास चाललेल्या सर्वसाधारण सभेतील विविध विषयांवर दिलेल्या उपसूचना या विधायकपणे कामे व्हावीत, यासाठीच दिल्या गेल्या. विकासकामांना विरोध ही भूमिका नव्हती. कोरे म्हणाले, भुयारी गटर योजनेचे काम वेळेत आणि लवकर पूर्ण व्हावे, यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करणे तसेच उपभोक्ता कर आणि मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन या अटी शासनाकडून शिथिल करुन आणाव्यात, यासाठी दोन उपसूचना दिल्या. त्या दोन्हीही त्यांनी स्वीकारल्या नाहीत. आम्ही त्यांनी केलेला ठरावच मतदानाला टाकला असता, तर ठराव मंजूर झाला नसता. परिणामी योजना अडचणीत आली असती. त्यामुळे शहराच्या हिताचा विचार करुन आम्ही दोन पावले मागे घेतली.ते म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातील विकासकामांच्या नियोजनाबाबत सत्ताधाऱ्यांची बेफिकीर वृत्ती समोर आली. त्यामुळे हा विषय त्यांना रद्द करावा लागला. मटण मार्केटच्या विषयाला आमचा विरोध नव्हता. किरकोळ खर्चासाठी १०-१२ लाख रुपये खर्च करण्यापेक्षा नवीन बांधकाम करावे, अशी उपसूचना दिली. महसुली अनुदाने नियमितपणे येतात. सत्ताधाऱ्यांनी विशेष अनुदानातून एक रुपाया आणला असेल तर दाखवून द्यावे. शहरात पूर्वी मंजूर झालेलीच विकासकामे सुरु आहेत. यांच्या कारकीर्दीत एकही नवीन विकासकाम मंजूर झालेले नाही. यावेळी शहाजी पाटील, बी. ए. पाटील, विश्वास डांगे, डॉ. संग्राम पाटील, अॅड. चिमण डांगे, बशीर मुल्ला, जयश्री माळी, संगीता कांबळे, जयश्री पाटील, सुनीता सपकाळ उपस्थित होत्या. (वार्ताहर)
विरोध ही राष्ट्रवादीची भूमिका नाही
By admin | Published: April 20, 2017 10:59 PM