लोकमत न्यूज नेटवर्कविटा : वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्यात वृक्षारोपण करण्यास तेथील वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्यांना रोखले. वृक्षारोपणासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असताना, पर्यावरणप्रेमींना वृ क्षारोपण करण्यापासून रोखणाऱ्या वनक्षेत्रपाल साळी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे राजकीय नेत्यांनी लावलेली झाडे काही कालावधीनंतर जळून गेली आहेत.या प्रकारावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर खानापूर तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित जाधव (आळसंद), सागरेश्वर अभयारण्याचे जनक वृक्षमित्र धों. म. मोहिते यांचे पुत्र सु. धों. मोहिते (मोहिते वडगाव) व सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ औंधे (वांगी) आदींसह कार्यकर्त्यांचा फौजफाटा सागरेश्वर अभयारण्यात वृक्षारोपणासाठी रोपे घेऊन दाखल झाला. त्याठिकाणी त्यांनी खड्ड्यांची स्वच्छता करून झाडे लावण्याचा प्रयत्न केला असता, वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी, राजकीय नेत्यांनी लावलेल्या झाडांच्या ठिकाणी असे कोणीही येऊन झाडे लावली, तर तो राजकीय नेत्यांचा अपमान होईल, अशी अरेरावीची भाषा वापरून वृक्षारोपण करण्यास कार्यकर्त्यांना विरोध केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला व वृक्षारोपण न करताच ते परत फिरले. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून वृक्षारोपण करू न देणाऱ्या वनक्षेत्रपाल साळी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
सागरेश्वर अभयारण्यात वृक्षारोपणास विरोध
By admin | Published: May 31, 2017 12:15 AM