लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायधारकांना महापालिकेकडून परवान्यासाठी २५९ इतके अर्ज विक्री झाले असून १६० जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरात हे शिबिर सुरू आहे. शुक्रवारी शिबिराचा शेवटचा दिवस आहे. गुरुवारअखेर सांगलीत ८४ प्रस्ताव, मिरजेत ६३ आणि कुपवाड कार्यालयात १३ अर्ज व्यवसाय परवान्यासाठी दाखल झाले आहेत.
--------
कचरा जाळल्याप्रकरणी व्यापाऱ्यास ५ हजाराचा दंड
सांगली : कर्नाळ रोड येथे सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याबद्दल महापालिका आरोग्य विभागाकडून येथील इलेक्ट्रिक साहित्य विक्रीच्या व्यापाऱ्यावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. याबाबत स्थानिक नागरिकांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार केली. व्यापारी आदित्य बंडगर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
---------
पावसाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
सांगली : येथील महापालिकेच्या उर्दू शाळा नंबर १८ च्या परिसरात पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचते. या पाण्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती. महापालिकेने या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी डीपीडीसी निधीतून ४० मीटर पाइपलाइनचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे आता शाळेच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
------
नगरसेविका, कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम
सांगली : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेविका आणि कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. साने गुरुजी उद्यानात फनी गेम्स आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, सभापती अप्सरा वायदंडे, नगरसेविका वर्षा निंबाळकर, नसीमा नाईक, नसीम शेख, कांचन कांबळे, उर्मिला बेलवलकर, सोनाली सागरे यांच्यासह महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.