तांदुळवाडी : पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हाती घराची जबाबदारी अधिक असते. ती योग्य प्रकारे पार पाडल्यास कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती समाधानी राहू शकते. यामध्येच प्रगती आहे. तेव्हा महिलांनी याचा विचार करायला हवा असे मत सुनिती मानसिंग नाईक यांनी व्यक्त केले.
मालेवाडी (ता. वाळवा) येथे महिला राष्ट्रवादी पक्षाचे वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा छायाताई पाटील होत्या.
नाईक म्हणाल्या की, सध्या महिला ही चूल मूल सांभाळत प्रत्येक कामामध्ये गतिमान होण्याचे यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहे. हे करत असताना आपल्या कुटुंबाची प्रगती कशी करता येईल व भविष्यकाळात आपण निर्माण केलेली प्रगती कायमस्वरूपी सांभाळणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम, स्वाती पाटील, कल्पना पाटील, शीला भासर, ग्रामसेविका कविता यादव आदी उपस्थित होत्या. जयश्री खडके यांनी प्रास्ताविक केले. अनिता गुरव यांनी आभार मानले.