उमदी (ता. जत) येथे कोरोना उपाययोजनांसंदर्भात उमदी ग्रामपंचायत सभागृहात आमदार विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामदक्षता समिती, मंडल अधिकारी, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, खासगी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटी म्हणाले की, उमदी येथील खासगी डॉक्टरांनी कोविडची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाला कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी सल्ला द्यावा. आपण दिवसभर तपासलेल्या रुग्णांची नोंद ठेवावी. शासन आदेशानुसार कोविड रुग्ण सोडून इतर रुग्णांवर उपचार करावेत. तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. गजानन गुरव यांनी खासगी डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
या बैठकीस सरपंच वर्षा शिंदे, बाबू सावंत, डॉ. रवींद्र हत्तळी, डॉ. एल. बी. लोणी, डॉ. राहुल पाटील, डॉ. भद्रगोंड उपस्थित होते.
चाैकट
महिला सरपंचांनी वेधले लक्ष
बैठकीत बेळोंडगीच्या महिला सरपंच कल्पना बुरकुले यांनी अवैध धंद्यांबाबतीत प्रश्न उपस्थित केला. दारू पिण्यासाठी लोक एकत्रित येतात, तसेच बाहेरील लोकही बेळोंडगी येथे दारू पिण्यासाठी येतात. मात्र पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद करण्यासाठी सहकार्य करत नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार विक्रम सावंत यांनी पोलिसांना तात्काळ अवैध व्यावसायिकांवर कारवाईच्या सूचना दिल्या.