लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगाव (ता. वाळवा) येथील शासकीय विश्रामगृह गेल्या वर्षभरापासून पूर्णत: बंद अवस्थेत आहे. आवारातील बाक, पंखे चोरट्यांनी पसार केले आहेत. रात्रीच्यावेळी याठिकाणी मद्यपी, जुगारींची रेलचेल असते. तालुका प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालून तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कासेगाव (ता. वाळवा) येथील शासकीय विश्रामगृह हे ब्रिटिश काळातील आहे. त्यामुळे या विश्रामगृहाला मोठा इतिहास आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या कार्यकाळापासून ते मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे हे विश्रामगृह साक्षीदार आहे. राष्ट्रीय महामार्गालगत हे विश्रामगृह असल्याने अनेक दिग्गज व्यक्ती या ठिकाणी वास्तव्यास राहिल्या आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ‘पदयात्री’ स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी कासेगावला आल्या होत्या. त्यावेळी प्रशासनाने या विश्रामगृहाची डागडुजी केली होती. स्वयंपाकगृहासाठी वेगळा हॉल बांधण्यात आला होता.
मात्र गेल्या दीड वर्षापासून हे विश्रामगृह पूर्णत: बंद अवस्थेत आहे. चोरट्यांनी या ठिकाणाहून बाक, पंखे पसार केले आहेत. इमारतीची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. मुख्य दरवाजा फोडला अडून रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी मद्यपी, जुगारींची मोठी वर्दळ असते. तालुका प्रशासनाने या ठिकाणी तातडीने लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
कोट
या विश्रामगृहाचा इनचार्ज मी आहे. या ठिकाणचे पूर्वीचे कर्मचारी बनसोडे हे निवृत्त झाल्यानंतर शासनाच्या धोरणानुसार मला नव्या कर्मचाऱ्याची नेमणूक करता येत नाही. त्यामुळेच हे विश्रामगृह सध्या बंद आहे. मीही काही करू शकत नाही.
- एस. पी. बुरले
अभियंता व गेस्ट हाऊस इनचार्ज, इस्लामपूर
फोटो : १५१२२०२०-आयएसएलएम-कासेगाव न्यूज
ओळ :
कासेगाव (ता. वाळवा) येथील शासकीय विश्रामगृह एक वर्षापासून बंद अवस्थेत आहे.