सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हाभर पसरलेल्या अनेक शाखांमध्ये बेशिस्त कर्मचाऱ्यांच्या कहाण्या गाजत असतानाच, बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी कारवाईच्या माध्यमातून त्यांचा राजेशाही थाट आणि बेशिस्तपणा संपुष्टात आणला आहे. गेल्या सहा महिन्यात एकूण चार कर्मचाऱ्यांना निलंबित करताना अध्यक्षांनी, अनेकांच्या मुख्यालयात बदल्या करून स्वच्छता मोहीम उघडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात २१७ शाखा आहेत. शाखाविस्तार मोठा असल्याने व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावरील नियंत्रणाला मर्यादा होत्या. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक शाखांमध्ये राजकीय वरदहस्त लाभलेल्या काही कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा वाढला होता. काहींनी बँकेच्या मुख्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येही आपली दहशत निर्माण केली होती. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस कोणीही दाखवत नव्हते. शिपाई पदावर काम करताना अधिकाऱ्यांच्या थाटात राहून मनमानी पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्याही मोठी होती. एका कार्यालयातील अशा बेशिस्त कर्मचाऱ्याचे अनुकरण अन्य शाखांमध्ये होत जाऊन अनेक तालुक्यात अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांची साखळीच तयार झाली. प्रशासकांच्या कालावधितही अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लागू शकली नाही. शिपाई असूनही हजेरी नोंदवून भटकंती करणे, अधिकारी, निरीक्षक, लेखापाल यांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, बदल्यांचे राजकारण करून राजेशाही थाटात राहणे, बँकेच्या हितापेक्षा स्वत:च्या फायद्याच्या गोष्टी करणे, अफरातफर करून आर्थिक शिस्त मोडणे अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. प्रशासकांचा कालावधी संपुष्टात येऊन बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिलीपतात्या पाटील यांच्याकडे आल्यानंतरही असे कर्मचारी गाफिल राहिले होते. त्यांच्या या कहाण्या अध्यक्षांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. चार कर्मचाऱ्यांना निलंबित करतानाच एकावर फौजदारी गुन्हाही दाखल केला. अनेकांना मुख्यालयात पाचारण करून स्वत:च्या नियंत्रणाखाली आणले. त्यामुळे बेशिस्त कारभाराला आता लगाम बसला आहे. काही कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखविण्याची सवय होती. अध्यक्षांनी अशा कर्मचाऱ्यांनाही मुख्यालयात बोलावून त्यांच्या टगेगिरीलाही आळा घातला. अध्यक्षांच्या या स्वच्छता मोहिमेची धास्ती, कारवाई न झालेल्या बेशिस्त कर्मचाऱ्यांनीही घेतली आहे. त्यामुळे कारवाईच्या ‘रडार’वर असलेले अनेक कर्मचारी आता शिस्तीच्या वाटेवरूनच जाणे पसंत करीत आहेत. (वार्ताहर)निरीक्षकांना दम : कर्मचाऱ्यावर कारवाईमांजर्डे येथील शाखेत काम करणारा देवा कांबळे नावाचा कर्मचारीही अशाच कारणाने प्रसिद्ध होता. त्याच्याबद्दल एका निरीक्षकाने तक्रार केली. त्यामुळे हा कर्मचारी निरीक्षकाच्या अंगावर धावून गेला होता. त्याच्यावरही कारवाई झाली आहे.
बेशिस्त कर्मचाऱ्यांना लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2016 11:13 PM