सदानंद औंधे, मिरज : रेल्वेच्या आॅनलाईन तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-तिकीट काढताना अनेक निर्बंध लागू होणार आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना घरबसल्या ई-तिकीट उपलब्ध होण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या सुविधेचा गैरफायदा घेणाऱ्या एजंटांवर नियंत्रणासाठी १५ फेब्रुवारीपासून नवीन निर्बंध येणार असल्याने अनधिकृत तिकीट एजंटांना चाप बसणार आहे. मोठी मागणी असलेल्या रेल्वेच्या तात्काळ तिकिटांचा आॅनलाईन काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेने नवीन निर्बंध लागू केले आहेत. यामुळे रेल्वेची तात्काळ तिकिटे कोणालाही झटपट मिळणार नाहीत. सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे तिकीट खिडकीसोबतच इंटरनेटवर तात्काळ ई तिकीट उपलब्ध आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिझम कंपनीच्या (आयआरसीटीसी) वेबसाईटवर नोंदणी करुन तात्काळ रेल्वे तिकीट काढण्याची सोय आहे. मात्र या सुविधेचा अनधिकृत तिकीट एजंटांनी फायदा घेतला आहे. वेगवेगळ्या मेल आयडीद्वारे आयआरसीटीसी वेबसाईटवर नोंदणी करुन त्याद्वारे एजंट तात्काळ रेल्वे तिकिटे काढत आहेत. नोंदणीनंतर एका प्रवाशास एका महिन्यात दहा तात्काळ तिकिटे मिळत असल्याने, एजंटांनी पंधरा ते वीस ई-मेल अकौंट उघडून वेगवेगळ्या नावाने नोंदणी केली आहे. अनधिकृत तिकीट एजंट अशाप्रकारे रेल्वे संकेतस्थळावर वेगवेगळ्या नावाने तात्काळ रेल्वे तिकिटे काढत आहेत. रेल्वे तिकीट खिडकीवर सकाळी दहा वाजता विक्री सुरु झाल्यानंतर किमान अर्धा तास तात्काळ तिकिटे मिळत होती. मात्र ई-तिकीट व्यवस्थेमुळे केवळ पाचच मिनिटात तात्काळ तिकिटे संपतात. या व्यवस्थेचा एजंटांनी गैरफायदा घेतल्याने सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकिटे मिळणे दुरापास्त झाले आहे. ई-तिकीट सुविधेचा गैरवापर व काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने संकेत स्थळावर नोंदणी करून तिकीट काढणाऱ्यांना आता एका दिवशी दोन व महिन्यात सहाच तिकिटे मिळणार आहेत. संकेतस्थळावरील क्विक बुक ही तिकिटाचा फॉर्म भरण्याची सुविधा सकाळी ८ ते १२ या तात्काळ तिकीट विक्रीच्या वेळेत बंद होणार आहे. संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर एकापेक्षा अधिक तिकिटे बुक करता येत होती. मात्र यापुढे एकापेक्षा अधिक तिकिटे बुक करण्यासाठी प्रत्येकवेळी लॉग आऊट करावे लागणार आहे. तिकीट बुक करताना आॅनलाईन बँक खात्यातून पैसे जमा करताना प्रवाशाच्या मोबाईल क्रमांकावर पासवर्ड मिळणार आहे. या एकाचवेळी वापरता येणाऱ्या पासवर्डच्या आधारे तिकिटाची रक्कम भरावी लागणार आहे. ई-वॉलेट, कॅश कार्डचा वापर करून यापुढे तिकिटाची रक्कम भरता येणार नाही. केवळ डेबिट, क्रेडिट एटीएम कार्डावर तिकिटाची रक्कम जमा करता येईल. वेगवेगळ्या युजर आयडीवरून एकाच एटीएमवरून अनेक तिकिटांची रक्कम जमा करता येणार नाही. एकाच संगणकावरून अथवा मोबाईलच्या आयपी अॅड्रेसवरून अनेक तिकिटांचे बुकिंग होत असल्यास, ही तिकिटे एजंटांकडून खरेदी करण्यात येत असल्याचे निष्पन्न होणार आहे. अशी संशयास्पद तिकिटे रद्द होणार आहेत.
रेल्वेच्या आॅनलाईन आरक्षणावर निर्बंध लागू होणार
By admin | Published: February 01, 2016 1:10 AM