नितीन पाटील
बोरगाव : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) गटात कृष्णेच्या रणांगणासाठी उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच अनेक माध्यमांतून प्रचार शिगेला पोहचला आहे. गुरूवारी कोण माघार घेणार व कोणाचे अर्ज रहाणार, यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. अशा स्थितीत गावाेगावी बॅनरला बॅनर व झेंड्याला झेंडा भिडला आहे. चौका-चौकात पताका झळकू लागल्या आहेत.
कृष्णा कारखान्याची निवडणूक पश्चिम महाराष्ट्रात नेहमीच लक्षवेधी ठरत आली आहे. आमदार-खासदारकीच्या निवडणुकीप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. सोशल मीडियाबरोबर पारंपरिक बॅनर, भिंती पत्रके, जाहीरनामे उमेदवारी पूर्वीच घराघरात पोहचले आहेत.
गल्लीबोळात व चौकाचौकात निवडणुकीची चुरस दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी मतदान करणारे बहुतांश मतदारांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. पण प्रचारात मात्र मतदानाचा अधिकार नसणाऱ्या बिनपगारी व फूल अधिकारी अशा तरुणांचीच संख्या अधिक दिसत आहे. एकूणच उमेदवार कोण? सत्ता कोणाची येणार याहीपेक्षा उर्वरित १० दिवसाच्या ‘फिल्डिंग’ची गणिते जमविण्यात हे तरुण कार्यकर्ते व्यस्त आहेत. एकूणच तरुणाईने निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचवला असला तरी अर्ज माघारीनंतर मात्र अनेकांच्या तोफा थंडावणार आहेत.