नारायण सातपुते ल्ल रेठरे बुद्रुक
जिल्हा परिषदेच्या रेठरे बुद्रुक गट व गणात दुरंगी अन् चुरशीची लढत होत आहे. या गटात मोहिते-भोसले मनोमिलन झाल्याने त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी पक्षाने आव्हान उभे केले आहे. येथील मोहिते-भोसले गटातील प्रतिष्ठांकडून आपला गट व गणासह बाहेरच्या गटातील सभांमधून काँगे्रस व राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर टीका करीत असल्याने मोहिते-भोसलेंचा प्रचार म्हणजे ‘कहीपे निगाहे और कहीपे निशाणा’ असा होत असल्याची चर्चा लोकांमधून केली जात आहे. रेठरे बुद्रुक गट व गणातील निवडणूक ही मोहिते-भोसले गट व काँगे्रस-राष्ट्रवादी या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्याचबरोबर संपूर्ण कऱ्हाड दक्षिणमध्ये मोहिते-भोसले गटाने कमळ फुलविण्याचा चंग बांधला असल्याने काँगे्रस व राष्ट्रवादीचे काय होणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद गटात व गणात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होत आहे. याठिकाणी कऱ्हाड तालुका विकास आघाडीतून उमेदवारच उभा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गटात ‘कमळ’ फुलणार की ‘घड्याळ’ येऊन विरोधकांचे बारा वाजणार हे मतमोजणीनंतरच पाहावयास मिळणार आहे. या दोन्ही गटांच्या नेतेमंडळींनी प्रचारासाठी पायात भिंगरी बांधली आहे. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसाअगोदरच या दोन्ही गटाने आपापले उमेदवार निश्चित करीत व ‘होम टू होम’ प्रचार सुरू केल्यामुळे चांगलीच रंगत वाढली आहे. रेठरे बुद्रुक गटात सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव असल्याने याठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे महिला उमेदवार उभे करण्यात आले आहेत. या गटात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झालेली आहे. मोहिते-भोसले यांचे ऐतिहासिक मनोमिलन झाल्यापासून त्यांनी काँगे्रस व राष्ट्रवादीवर सडेतोड टीका करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या विधानसभेला मदनराव मोहिते काँगे्रसमध्ये होते. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयामध्ये त्यांचा ‘सिंहा’चा वाटा होता. निवडणुकीनंतर काँगे्रसचे विचार पटत नसल्याने ते काही काळ अविरत राहिले व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर मोहिते-भोसलेंनी मनोमिलन केले. त्यात मदनराव मोहिते भाजपमध्ये दाखल झाले. भाजपमध्ये दाखल झाल्यापासून मदनराव मोहिते हे रेठरे बुद्रुक गटात व गणात कऱ्हाड तालुका विकास आघाडीवर, काँग्रेस-राष्ट्रवादीवरच टीका करीत आहेत. गट व गण सोडला तर इतर ठिकाणी सभांमधून काँगे्रसवर मोहिते-भोसले गटाकडून जास्त करून टीका केली जात आहे. विविध सभांमधून मोहिते अन् भोसले आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यावर टीका करीत आहेत. उमेदवार निश्चित झाल्यापासून दोन्ही गटांचे उमेदवार व कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा धडाका लावला गेला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीची एकही सभा या गटात झाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. गेल्या काही प्रचार सभांचा आढावा घेतल्यास मोहिते-भोसलेंनी आजी-माजी आमदारांना टार्गेट केले आहे. जास्त करून आमदार आनंदराव पाटील यांच्यावर सडेतोड टीका या मोहिते-भोसले गटाच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यामुळे या गटातील व गणातील मतदार कुणाला निवडून देणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.