लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सुमारे तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात पुनरागमन केले. शुक्रवारी दिवसभर सर्वत्र संततधार सुरू होती. पेरण्या केलेले शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्यांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी सर्वच तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. सांगली, मिरज शहरे व मिरज तालुक्यात दुपारपासूनच संततधार होती. विशेषत: सांगलीत चांगल्या सरी कोसळल्या. जत, खानापूर, आटपाडी, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्यात तास-दोन तास रिपरिप सुरू होती. कवठेमहांकाळ तालुक्यातही तासभर चांगला पाऊस झाला. शिराळा तालुक्यात मात्र दडी मारली. कडेगावमध्येही हलक्या सरी कोसळल्या. तासगावमध्ये दुपारनंतर हलका पाऊस झाला. इस्लामपूर, आष्टा, वाळवा परिसरात सकाळपासूनच दमदार सरी कोसळत होत्या. आष्ट्यात दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस परतल्याने शेतकरी आनंदले आहेत. जूनच्या मध्यात चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला होता.२० जूननंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. विहीर, शेततळी व कुपनलिकांतील पाण्याने पिके जगवण्याची धडपड सुरू होती. कसदार जमिनीतील ओलही वाळू लागल्याने पिके करपण्याचा तसेच दुबार पेरण्यांचा धोका होता. शुक्रवारच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. आजचा पाऊस पुरेसा नसला तरी पिकांसाठी फायदेशीर ठरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी आठवडाभर पावसाची संततधार सुरू राहणार आहे.