सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपला धक्का देणाऱ्या सहा फुटीर नगरसेवकांचे खुलासे अद्यापही पक्षाला मिळालेले नाहीत. हे खुलासे पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे भाजपला आणखी एक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. खुलासे प्राप्त होताच अपात्रतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करू, असे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले.
महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपचे नगरसेवक महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीम नाईक तसेच सहयोगी सदस्य विजय घाडगे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले आहे, तर आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे हे दोघे गैरहजर राहिले होते. फुटीर सहा नगरसेवकांना १ मार्च रोजी भाजपच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. सात दिवसात खुलासे मागविले होते. दरम्यान सहाही नगरसेवकांनी खुलासे तयार केले आहेत. मंगळवारी ते पोस्टामार्फत पाठविले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत भाजपकडे खुलासे प्राप्त झाले नव्हते.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले, फुटीर सहा नगरसेवकांना नोटिसा पाठविलेल्या आहेत. उद्यापर्यंत खुलासे येतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाईल. पक्षविरोधी भूमिकेबद्दल फुटीर नगरसेवकांवर कारवाई होईल.